वसईतील तरुणांची श्रद्धानंद आश्रमातील वृद्ध मातांसोबत दिवाळी
‘दिवाळसणाच्या निमित्ताने तरी आपली मुले न्यायला येतील’, या आशेने दाराकडे डोळे लावून बसलेल्या वसईतील श्रद्धानंद महिला वृद्धाश्रमातील मातांचे लेकरांसोबत दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ही त्यांची पोटची मुले नव्हती. पण या लेकरांसोबत त्यांनी गाणी म्हटली, नृत्य केले, फराळाचा आस्वाद घेतला. वृद्धाश्रमातील या मातांची व्यथा ‘लोकसत्ता वसई-विरार’मधून प्रसिद्ध होताच वसईतील जागरूक नागरिक संघटनेच्या युवकांनी या आश्रमास भेट देऊन या वृद्ध महिलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
वसईतील श्रद्धानंद आश्रमातील अनेक वृद्ध महिला ‘दिवाळीसाठी आपली मुले न्यायला येतील’ अशा आशेने त्यांची प्रतीक्षा करत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध झाले होते. आयुष्यभर काबाडकष्ट करून ज्या मुलांना स्वत:च्या पायावर उभे केले, त्या मुलांकडूनच या मातांकडे दुर्लक्ष होत असल्याची हृदयद्रावक कहाणी जागरूक नागरिक संस्थेच्या सदस्यांच्या वाचनात येताच त्यांनी या मातांना दिवाळीची अनोखी भेट देण्याचा निर्धार केला. या संस्थेतील युवकांनी श्रद्धानंद आश्रमास भेट देऊन या महिलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. या तरुणांचे प्रेम आणि उत्साह पाहून आश्रमातील माताही आनंदी झाल्या. त्यांनी या तरुण-तरुणींसोबत गाणी म्हटली, नृत्य केले. या लेकरांचे प्रेम पाहून त्या माता आपल्या लेकरांकडून वाटय़ाला आलेल्या उपेक्षेचे दु:खही विसरून गेल्या.
‘या वृद्ध मातांची आम्ही मुले नाहीत. पण आम्ही त्यांची मुले बनून त्यांना आनंद देऊ शकतो, याची जाणीव झाली व आम्ही वृद्धाश्रमात आलो,’ असे जागरूक नागरिक संस्थेचे अध्यक्ष चिन्मय गव्हाणकर यांनी सांगितले.
तूच माझा मुलगा..
जागरूक नागरिक संस्थेच्या युवकांनी वसईतील ‘स्नेह सदन’ या महिला वृद्धाश्रमासही भेट देऊन तेथील महिलांसोबत दिवाळी साजरी केली. या तरुणांच्या आपुलकीने या आश्रमातील एक माता अक्षरश: गहिवरून गेली. संस्थेचे तरुण कार्यकर्ते रूलेश रिबेलो यांना एका वृद्ध महिलेने उराशी धरले. ‘माझा मुलगा आला नाही. पण आता तूच माझा मुलगा आहे. तू नेहमीे येत रहा,’ असे आर्जव करताना या मातेच्या डोळय़ांत आनंद आणि दु:ख या दोन्ही भावनांच्या अश्रूनी ओले झाले होते.