पब, डिस्कोथेक, डान्सबारवरील कारवाईमुळे प्रकाशझोतात आलेले सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची वाकोल्यात फेरीवाल्याचा मृत्यू झाल्यामुळे झालेली बदली सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ढोबळेंची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आलेली असल्यामुळे त्यांना नवी नियुक्ती मिळेपर्यंत ते पोलिसांच्या भाषेत ‘झाडा’खालीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईतील समस्त पब, डिस्कोथेक तसेच बारमालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वाकोल्यातील फेरीवाले आनंदित झाले असले तरी ढोबळेंना पुन्हा वाकोल्यात आणावे यासाठी सह्य़ांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वाकोला येथील अनेक बेकायदा धंद्यांना पायबंद घातल्यानंतर ढोबळे यांनी आपला मोर्चा सांताक्रूझ रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांकडे वळविला होता. पदपथासह रस्त्याचा अध्र्याहून अधिक भाग व्यापणाऱ्या या फेरीवाल्यांविरुद्ध कोणीही कारवाई करण्यास धजावत नव्हते. याबाबत तक्रारी आल्यानंतर ढोबळे यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविले. त्यावेळी पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे कारवाई करता येत नाही, अशी भूमिका या पालिका अधिकाऱ्यांनी घेतली. ढोबळे यांनी लगेच पोलीस बंदोबस्त देण्याचे मान्य केले आणि मग पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. मात्र या कारवाईमुळे फेरीवाले मेटाकुटीस आले होते. या फेरीवाल्यांवर कारवाई होऊ नये म्हणून एका खासदाराने तसेच आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल असलेल्या आमदाराने दूरध्वनी केला. परंतु ढोबळे यांनी या दोन्ही लोकप्रतिनिधींना जुमानले नाही. मात्र कारवाईदरम्यान फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याचे निमित्त झाले आणि ढोबळेंना जावे लागले. परंतु अशीच घटना दहीसर येथे घडल्यानंतर तशी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल केला जात आहे.
ढोबळेंच्या वाकोल्यातील तथाकथित दहशतीचे वृत्त आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्यापर्यंत पोहोचले होते. परंतु बेकायदा धंद्यांना आळा बसत असल्यामुळे पोलीस आयुक्त तसेच सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांनीही ढोबळे यांना छुपा पाठिंबा दिला होता. मात्र फेरीवाल्याच्या नैसर्गिक मृत्यूचे राजकारण करण्यात आल्यानंतर या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. त्यांना राजकीय दबावापुढे नमावे लागले. ढोबळेंच्या निलंबनाचीच मागणी केली जात होती. मात्र या मागणीस या दोन्ही अधिकाऱ्यांनी ठाम इन्कार दिला. त्यानंतर वाकोल्यातून बदली करून त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत म्हणजेच नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले.
वाकोल्यात एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्यामुळे ढोबळेंची बदली करण्याचा निर्णय घेणाऱ्या गृहखात्याने दहिसर येथे अतिक्रमण पाडण्याच्या कारवाईदरम्यान झालेल्या एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी कुठल्याही पोलीस वा पालिका अधिकाऱ्याला का दोषी धरले नाही, असा सवाल वाकोला येथील वरिष्ठ नागरिक संघ, सांताक्रूझ रहिवाशी संघ, रत्नाकर सोसायटी, व्हिनस व्हॅली, दत्तमंदिर रहिवासी संघ, मराठा एकता संघ आदींनी केला आहे.