16 November 2019

News Flash

नांदगावकरांच्या मनसे स्टाइल अल्टीमेटमनंतर वाशीच्या उड्डाणपूलावरील पथदिवे दुरुस्त

२०० पैकी ५२ पथदिवे दुरुस्त, दिवाळीपर्यंत सर्व दिवे सुरु करणार

नांदगावकरांचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांचा एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नांदगावकर हे वाशी पुलावर गाडीतून प्रवास करताना दिसत आहे. आपण सतत केलेल्या पाठपुरवठ्यामुळे सहा महिन्यापूर्वी पूर्णपणे अंधरात असलेल्या वाशी पुलावरील २०० पैकी ५२ पथदिवे सुरु झाल्याचा दावा नांदगावकर यांनी केला आहे.

नांदगावकर यांच्या सांगण्याप्रमाणे रात्री साडेतीन वाजता हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये वाशी पुलावरील पथदिव्यांच्या उजेडात गाड्या जाताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजेच ७ जानेवारीपासून मी या उड्डाणपुलावरील बंद पथदिव्यांचे काम करावे यासाठी सतत पाठपुरावा केला. यासंदर्भात अधिकाऱ्यांना भेटून वाशी उड्डाणपुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि अपघात याबद्दलची माहिती मी अधिकाऱ्यांना दिल्याचे नांदगावकर सांगतात. मुळात या गोष्टीची दखल प्रशासनाने घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही अशी खंत नांदगावकर यांनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.

वाशी पुलावर २०-२० मीटरच्या अंतरावर पथदिवे असून ते सगळेच खराब झाल्याने पुलावरुन रात्रीच्या वेळी प्रवास करणे नागरिकांसाठी असुरक्षित झाले होते. याप्रकरणात आपण लक्ष घालून हे पथदिवे दुसरुस्त करावे अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’कडे (एमएसआरडीसी) केली होती. मागील सहा महिन्यांपासून पाठपुरवठा केल्यानंतर अखेर सोमवारी जाऊन मी या अधिकाऱ्यांना भेटून अल्टीमेटम दिल्यानंतर उड्डाण पुलावर सहा महिन्यांनी प्रकाश पडला. उड्डाण पुलावरील २०० पैकी ५२ पथदिवे दुरुस्त करण्यात आले असून एमएसआरडीच्या जगताप यांनी मला तसा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवल्याचे नांदगावकर यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

‘प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामाबद्दल इच्छाशक्ती ठेवली तर कितीही वेळ गेला तरी जनतेच्या हिताची कामे होऊ शकतात. मात्र प्रशासनाच्या प्रत्येक विभागात इच्छाशक्तीचा अभाव हा दिसून येतो. त्यातून जनतेप्रती बेपर्वा वृत्तीचे दर्शन हमखास होते. सरकारी बाबूंकडून जनतेच्या सर्वच कामांमध्ये बेपर्वा वर्तवणूक बघायला मिळते आणि म्हणूनच माझा पोकळ बांबू चालतो. तो यापुढेही चालत राहील,’ असं नांदगावकर यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पोस्टच्या शेवटी त्यांनी जनतेची कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. ‘जनतेची कामे झालीच पाहिजेत. जर वेळच्या वेळी ती केली नाहीत तर मी येणारच. जनतेची सुरक्षा महत्वाची आहे याचे भान अधिकाऱ्यांना असले पाहिजे जर कोणी निष्काळजीपणा केला तर चुकीला माफी नाही,’ असा मनसे स्टाइल इशारा नांदगावकर यांनी पोस्टमधून दिला आहे.

पोस्टच्या सुरुवातील नांदगावकर यांनी ‘एमएसआरडीसी’चे अधिकारी या प्रकरणात काठावर पास झाल्याचे म्हटले आहे. तसेच सध्या ५२ दिवसे सुरु झाले असले तरी दिवाळीआधी सगळे दिवे लावले जातील अशी लेखी हमी हे अधिकारी देणार असल्याचेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.

First Published on June 12, 2019 12:30 pm

Web Title: vashi bridge gets street light after 6 months nitin nandgaonkar posted video scsg 91