सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या ‘दि बॉम्बे आर्ट सोसायटी’ या कलासंस्थेच्या व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आणि प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत आणि चित्रकार प्रा. अनिल नाईक यांचे संपूर्ण पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून आले. शुक्रवारी सायंकाळी ही निवडणूक पार पडली.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत समितीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रफुल्ला डहाणूकर यांनी समर्थपणे सांभाळली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर समितीत उपाध्यक्ष असलेल्या चित्रकार वासुदेव कामत यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होताच समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि त्यामध्ये कामत-नाईक यांचे पॅनेल विजयी झाले.
या निवडणुकीत ४९१ जणांनी मतदान केले. त्यापैकी कामत यांना ३०७ तर प्रतिस्पर्धी उमेदवार विजय राऊत यांना १८४ मते पडली. कामत-नाईक यांच्या पॅनेलवरील शिल्पकार चंद्रजीत यादव यांची सचिवपदावर तर प्रा. सुरेंद्र जगताप यांची खजिनदार म्हणून निवड झाली. याशिवाय प्रा. अनिल नाईक, प्रा. नरेंद्र विचारे, शिल्पकार अजिंक्य चौलकर, श्रीमती माधवी गांगण, निवेश किंकळे, गणपत भडके आणि चित्रकार श्रीकांत कदम यांची कार्यकारिणीवर निवड झाली.