News Flash

सेवाव्रत : वात्सल्याचा झरा

त्यांना हक्काचे पालक मिळवून दिले जातात. अंगी संतत्व असल्याशिवाय हे काम होणे शक्य नाही

प्रत्यक्ष जन्मदात्यांनी नाकारलेल्या मुलांचा आईच्या मायेने सांभाळ करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारी संस्था म्हणजे मुंबईतील वात्सल्य ट्रस्ट. समाजाने टाकून दिलेल्या अनेक बालकांचे येथे मायेने  संगोपन केले जाते. त्यांना हक्काचे पालक मिळवून दिले जातात. अंगी संतत्व असल्याशिवाय हे काम होणे शक्य नाही. अनाथ अर्भकांना आश्रय आणि त्यांचे पुनर्वसन हेच जीवनाचे धेय मानून सेवाभावाचा अखंड नंदादीप बनून काम करणाऱ्या ऋषीतुल्य व्यक्ती अनाथांचे नाथ बनून येथे दीपस्तंभासमान कार्य करीत आहेत.

कांजुरमार्ग येथील ‘वात्सल्य ट्रस्ट’ अनाथ बालकांना आधार देणारी, त्यांना हक्काचे कुटुंब मिळून देणारी देशातील एक आदर्श संस्था आहे. ऐंशीच्या दशकात अनाथ मुलांविषयी तसेच दत्तक गेलेल्या मुलांचे होणारे हाल याविषयी माध्यमातून खूप बातम्या प्रसिद्ध व्हायच्या. त्या वाचून काही जण अस्वस्थ झाले. त्यांनी त्यावर खूप विचार केला आणि वात्सल्य संस्थेची स्थापना केली. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित गजानन दामले, डॉ. शि. द. आठवले, विनोद निजसुरे, संजीवनी रायकर, वसंतराव भागवत, दत्तात्रय डबीर, ना. सि. सराफ, ना. स. भागवत आदी मंडळींचा पुढाकार होता. १९८३ मध्ये कांजुरमार्ग येथील श्री विजयकुंज सोसायटीत ९०० चौरस फुटाच्या छोटय़ा जागेत संस्थेचे कामकाज सुरू झाले. समाजाने टाकून दिलेली बालके हळूहळू संस्थेकडे येऊ लागली. संस्थेचे कामकाज वाढू लागले तशी मोठय़ा जागेची आवश्यकता निर्माण झाली. मग संस्थेने निधी मिळविण्यापासून बालकांच्या संगोपनाची पद्धतशीर आखणी केली. त्यातून आता कांजुरमार्ग येथे संस्थेची २० हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली चार मजली सुसज्ज इमारत उभी राहिली. त्यातील सात हजार चौरस फुटामध्ये अर्भकालयाची व्यवस्था आहे. गेल्या ३३ वर्षांच्या कालखंडात संस्थेने १३१० बालकांचे संगोपनच केले नाही तर यातील १११८ मुलांना वेगवेगळ्या कुटुंबात दत्तक देऊन त्यांना पालक मिळवून दिले. संस्थेत येणाऱ्या बालकांचे संगोपन करण्यासाठी प्रशिक्षित आया, परिचारिका तसेच बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी आदी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. एखादे मूल दत्तक देताना ज्या कुटुंबात हे मूल दत्तक दिले जाणार आहे, त्यांचा सर्व तपशील तसेच दत्तक दिल्यानंतरही त्याचे योग्य संगोपन केले जात आहे किंवा नाही याकडे संस्थेकडून बारीक लेक्ष ठेवले जाते. ‘वात्सल्य’मध्ये आजही ४५ बालकांचे मायेने संगोपन केले जाते. या बालकांना दत्तक घेण्यास कोणी पालक फारसे उत्सुक नसतात. कारण त्यातील काही अंध आहेत तर काही गतिमंद व अपंग आहेत. या बालकांची कायमस्वरूपी जबाबदारी संस्था समर्थपणे सांभाळत आहे. सध्याच्या जागेशेजारी पालिकेची एक जुनी इमारत आहे. लसीकरणाचा कार्यक्रम वगळता येथे फारसे काही होत नसल्यामुळे ‘वात्सल्य’ने ही इमारत बांधून देण्याची व तेथे मूक-बधिर व अपंगांचे केंद्र काढण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशारीतीने एकीकडे ‘वात्सल्य’चे काम आकाराला येत असतानाच २००० साली संस्थेने नवी मुंबईतील सानपाडा येथे तीन मजली इमारत बांधून तेथे बालिकाश्रम आणि वृद्धाश्रम सुरू केला. येथील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर चार ते १८ वयोगटाच्या ३५ मुली राहतात. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल तसेच अनाथ असलेल्या या मुलींच्या शिक्षणाची तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मदत केली जाते. पहिल्या मजल्यावर वृद्धाश्रम असून येथील बारा खोल्यांमध्ये २४ वृद्धांची व्यवस्था होऊ शकते. सध्या येथे पंधरा वृद्धमंडळी असून त्यांच्या आरोग्यापासून सर्वप्रकारची काळजी सेवाभावी वृत्तीने येथील कर्मचारी घेत असतात. याच जागेत २००८ पासून गरजू मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी रुग्णसेविका प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला जात आहे. त्याचप्रमाणे संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातूनही अनेकांना प्रशिक्षित केले जात आहे. २००७ पासून अलिबाग येथेही अनाथ मुलांसाठी प्रकल्प सुरू करण्यात आला असून अलिबाग येथे सध्या १४ बालकांचे संगोपन करण्यात येत आहे. दामले काकांपासून सराफ काकांसारख्यांचा सेवाभावाचा आदर्श घेऊन तरुणांनी पुढे आले पाहिजे. निस्वार्थी सेवा म्हणजे काय हे पाहायचे असेल तर एकदा तरी ‘वात्सल्य’मध्ये जाऊन आले पाहिजे. समाजाने टाकून दिलेल्या बालकांचे लालनपालन करताना संस्थेने कधी जात पाहिली नाही. या अनाथ बालकांना मायेची सावली दिली. हे पाहिल्यानंतर झेंडाच हातात घ्यायचा असेल तर सेवेचा झेंडा हाती घेऊन तरुणाईने फडकवला तर समाजाचे चित्र निश्चित बदलल्याशिवाय राहणार नाही एवढेच म्हणावेसे वाटते.

संपर्क- वात्सल्य ट्रस्ट, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई. – दूरध्वनी- २५७८२९५८.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 2:21 am

Web Title: vatsalya trust in kanjurmarg mumbai
Next Stories
1  ‘विद्युत ऑडिट’ होत नसल्याने निवासी संकुलात आगीच्या घटना
2 स्थगिती आदेश, तरीही कारवाई
3 सीएसटी परिसरात पर्यटकांसाठी निरीक्षण स्थळ
Just Now!
X