राज्यपाल कुलपती सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. पंधरा दिवस त्यांना कुलगुरूपदाच्या कामापासून दूर ठेवण्यात आले होते.
पदभार स्वीकारताच त्यांनी कुलसचिवांची भेट घेऊन प्रशासकीय अडचणींचा आढावा घेतला. रखडलेल्या निकालांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी परीक्षा नियंत्रकांची बैठक बोलावली आहे. वेळुकर यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने त्यांची पात्रता निकषांनुसार निवड झाली आहे किंवा नाही हे तपासण्याचे आदेश शोध समितीला दिले होते. या निर्णयाला अनुसरून राज्यपालांनी वेळुकर यांना कामावरून दूर राहण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानुसार ५ मार्च रोजी राज्यपालांनी वेळुकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले.