पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे हातातोंडाशी आलेली शिवारातील भाजी आगाऊ काढून ती बाजारात पाठविण्याचे प्रमाण वाढले असून मुंबईत भाजी जास्त आणि ग्राहक कमी असे चित्र आहे. त्यामुळे भाजीबाजारावर संकट उभे राहिले आहे.
राज्यातील भाजीची आवक वाढत असताना परराज्यातील भाजीचे आक्रमणही वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोबी-प्लॉवर मोठय़ा प्रमाणात मुंबई बाजारात पाठविला आहे. ही भाजी टवटवीत नसल्याने तिला अधिक भाव नाही. याउलट कर्नाटकमधून येणाऱ्या वाटाणासारख्या भाज्यांना सध्या मागणी जास्त आहे. भाजी बाजारात गेली तीन महिने मंदीचे वातावरण आहे. त्यात आता अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आवक वाढली आहे, पण भाव पडले आहेत. ही स्थिती आणखी १५ ते २० दिवस राहिली तर नंतरच्या काळात भाज्यांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे, असे एपीएमसी भाजी बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे
यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 5:41 am