किमतीत २०-२५ टक्के वाढ; येत्या काळात दर आणखी वाढण्याची भीती

नवी मुंबई कडाक्याचा उन्हाळा, वाहतूकदारांनी केलेली दरवाढ आणि कमी आवक यामुळे मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील घाऊक भाजी बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत. काही प्रमुख भाज्यांच्या किमती २०-२५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. येत्या काळात ही दरवाढ ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात उन्हाची काहिली वाढली आहे. त्याचा परिणाम भाजी उत्पादनावर झाला असून आवक घटली आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलची दरवाढ झाल्याने वाहतूकदारांनी दरात १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे भाजी उत्पादक भाजी मुंबईत न पाठविता स्थानिक बाजारांत विकू लागले आहेत. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

तुर्भे येथील घाऊक बाजारात रोज सामान्यपणे ५५० ते ६०० ट्रक-टेम्पो भरून भाज्या येतात. सोमवार-मंगळवारी ही आवक १५० गाडय़ांनी कमी होऊन ४१८ ते ४२० गाडय़ा इतकी झाली. त्याचा परिणाम होऊन भाज्यांचे दर वाढले. भेंडी, चवळी, फरसबी, गवार, घेवडा, काकडी, कारली, केळी, रताळी, शेवग्याच्या शेंगा, सुरण, वाटाणा, कोिथबिर, मुळा, कढीपत्ता, शेपू ह्य़ा भाज्या महाग झाल्या असून दुधी, प्लॉवर, गाजर, कोबी, पडवळ, मुळा, पालक, पुदीना ह्य़ा भाज्या सध्या तरी ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात १५-२० रुपये किलोने मिळणाऱ्या भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकल्या जात आहेत.

कडक उन्हामुळे भाज्यांची आवक आधी कमी होऊ लागली होती. त्यात डिझेल, पेट्रोल भाववाढीमुळे वाहतूकदार भाजी उत्पादकांकडे जास्त वाहतूक खर्चाची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी स्थानिक घाऊक बाजारात भाजी विकून मोकळे होत आहेत. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाज्यांच्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली असून मंगळवारी ही संख्या १५० टेम्पोने घटली. त्यामुळे भाज्यांची दरवाढ झाली असून हे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

– कैलाश तांजणे, अध्यक्ष, घाऊक भाजी व्याापारी महासंघ, नवी मुंबई</strong>