शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थतेचा परिणाम गुरुवारपासून तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारावरदेखील झाला. घाऊक बाजारात १०० ट्रकच भाजी आल्याने आज भाज्यांचे भाव ५० टक्क्याने महागले. त्यामुळे दहा रुपयांना मिळणारी कोंथिबीरची झुडी ५० ते ६० रुपयांना विकली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी बुधवारपासून चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम एपीएमसीतील घाऊक बाजारावर मोठय़ा प्रमाणात झाला. नाशिवंत असलेल्या भाजी बाजाराला याचा मोठा फटका बसला असून दिवाळीच्या दिवशी ५५० ट्रक भाजी बाजारात आली.
शिवसेनाप्रमुखाबद्दल याच रात्री अफवा पसरण्यास सुरुवात झाल्याने बाजारात मुंबईतील किरकोळ विक्रेत फिरकले नाहीत. त्यात मुंबईचा काही भाग बंद राहिला. त्यामुळे ४५० ट्रकमधील भाजी पडून राहिली. दादरला गेलेला टेम्पो तसाच परत आला. त्यामुळे व्यापारी भाजी फुकट विकायला तयार होते तरी घ्यायला गिऱ्हाईक नव्हते. शेवटी काही शिल्लक भाजी आज व्यापाऱ्यांनी गुजरातमध्ये पाठवली अशी महिती भाजी बाजाराचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. त्यात येथील वातावरणामुळे आज शेतकऱ्यांनीच भाजी कमी पाठवली. केवळ १००-१२५ ट्रक भाजी आज बाजारात आली.
कालच्यापेक्षा आजचे वातावरण चांगले असल्याने किरकोळ विक्रेत बाजारात आले होते, पण भाजीच नसल्याने भाव चढ राहिले. त्यात काही व्यापाऱ्यांनी या संधीचा फायदा उचलून दोन दिवसांपूर्वी दहा रुपयांनी विकली गेलेली कोथिंबिरची झुडी ५० ते ६० रुपयांना विकली गेल्याचे समजते.