कोथिंबिरीची एक लहानगी जुडी ६० रुपयांना. जेमतेम १०० ग्रॅम आल्याची किंमत ३५ रुपये. १०० ग्रॅम हिरव्या मिरची २५ ते ३० रुपये.. रोजच्या जेवणात वाटण म्हणून वापरला जाणारा हा हिरवा मसाला आता सर्वसामान्यांच्या खिशाचीच वाट लावत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसाचे कारण सांगून मुंबई, ठाण्यातील किरकोळ भाजीमंडय़ांत भाज्या व हिरव्या मसाल्याच्या घटकांचे दर अवाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराला पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून आयात होणाऱ्या भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशीतील घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. मात्र, याचा पुरेपूर फायदा घेत किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी भाज्यांचे दर मोठय़ा प्रमाणात वाढवले आहेत.
नाशिक जिल्ह्य़ात कोथिंबिरीचे पीक कमी असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारात भलीमोठी कोथिंबिरीची जुडी ८० ते १०० रुपयांना विकली जात आहे. असे असताना किरकोळ बाजारात मात्र तिचा दर २०० रुपयांपर्यंत जाऊन भिडला आहे. यावर्षी कर्नाटक तसेच साताऱ्याहून येणारे आल्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचे आले किलोमागे १४० रुपयांनी विकले जात होते. मात्र, बुधवारी आल्याच्या किमती ११ रुपयांपर्यंत खाली आल्या असताना विलेपाल्र्याच्या किरकोळ बाजारात १०० गॅ्रम आल्यासाठी ३५ रुपये आकारण्यात येत होती.
आलं, कोथिंबिरी, मिरच्यांच्या जोडीला चांगल्या प्रतीचा टॉमेटो, भेंडी (८०), गवार (६०), वांगी (६०), ढोबळी मिरची (६०) अशा भाज्याही किरकोळ बाजारात चढय़ा दराने विकल्या जात आहेत. घाऊक बाजारात टॉमेटो किलोमागे २४ ते २८ रुपयांना असताना किरकोळ बाजारात ७० रुपयांनी विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात ३० रुपयांना मिळणारी भेंडी किरकोळ बाजारात ७५-८० रुपये दराने विकली जात आहे.