27 September 2020

News Flash

संचारबंदीतही नाशिकहुन भाजीपाल्याचा पुरवठा नियमित

बाजार समितीकडून वाहनांना पत्र वाटप

मुंबईच्या दादर मार्केटमधील सकाळची परिस्थिती (छाया - प्रशांत नाडकर)

करोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात मुंबईला दररोज होणारा भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत राखण्याचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रयत्न आहे. संचारबंदी लागू झाल्यानंतर प्रारंभी भाजीपाल्याच्या वाहनांना मुंबईत प्रवेश मिळाला, पण परतीच्या प्रवासात रिकाम्या वाहनांमुळे अडचणींना तोंड द्यावे लागले. असे घडू नये म्हणून संबंधित वाहनधारकांना नाशिक बाजार समितीने कृषिमालाची वाहतूक करणारे वाहन असे पत्र देण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी ५० हून अधिक वाहनांसाठी व्यापाऱ्यांना अशी पत्र देण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरूण काळे यांनी दिली. या व्यवस्थेमुळे शेतकरी माल बाजारात विक्रीसाठी आणतील आणि व्यापाऱ्यांना तो मुंबईला नेता येईल.

एरवी नाशिक बाजार समितीतून सुमारे ७० ते ८० वाहने (टेम्पो) मुंबईच्या बाजारात भाजीपाला आणि अन्य कृषीमाल घेऊन जातात. सध्या बाजार समितीत आवक २५ टक्के घटली आहे. परंतु जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने शेतकरी कृषीमाल बाजारात आणतील, असे समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बाजार समितीच्या नाशिक शहरातील मुख्य आवारात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गर्दी रोखण्यासाठी पंचवटी मार्केटमधील लिलाव आता शरदचंद्र पवार मार्केटमध्ये होतील, असे जिल्हा सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार समितीचे पंचवटी मार्केट यार्डमधील सकाळ सत्रातील किरकोळ विक्रेते/चवली दलाल व कोबी फ्लॉवर लिलाव शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये २५ मार्च २०२० पासून स्थलांतरित करण्यात येत आहे. हापसन व पालेभाज्यांचे लिलाव पंचवटी मार्केट मध्येच होतील, याची सर्व शेतकरी, दलाल, विक्रेते, व्यापारी यांनी नोंद घ्यावी, असे बलसाने यांनी म्हटले आहे.

दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता जनेतीश संवाद साधत मोठी घोषणा केली. पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या दिवसांमध्ये नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. अन्नधान्य, किराणा माल, दुध यासारख्या अत्यावश्यक सेवांना यामधून सवलत देण्यात आली आहे. मात्र पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मुंबईच्या काही रस्त्यांवर किराणा मालाच्या दुकानांवर गर्दी पहायला मिळाली. या परिस्थितीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“संपूर्ण राज्यात अन्न-धान्याचा पुरेसा साठा आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी सर्व रेशन दुकानांना सध्याच्या घडीला योग्य प्रमाणात धान्य मिळेल याची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांनी धान्याची चिंता करु नये….जिवनावश्यक वस्तू तुम्हाला मिळत राहणार आहे. फक्त किराणा माल, रेशनच्या दुकानावर जात असताना गर्दी करणं टाळा…सोशल डिस्टन्स राखणं हे गरजेचं आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही.” राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 11:28 pm

Web Title: vegetable supply from nashik to mumbai will continue in section 144 psd 91
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक सेवा सुरुच राहतील- उद्धव ठाकरे
2 मुंबईत सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबीयांना करोना व्हायरसची लागण, लोकलने केला प्रवास
3 Video : … अन् गृहमंत्री अनिल देशमुख स्वतःच उतरले रस्त्यावर
Just Now!
X