घाऊक, किरकोळ बाजारातील दर कडाडले; पिकांच्या नुकसानीची झळ ग्राहकांना

मुंबई : परतीच्या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्याची झळ शहरातील ग्राहकांना बसत आहे. भाज्यांची आवक घटल्याने मुंबईतील किरकोळ आणि घाऊक बाजारातील दर कडाडले आहेत. कांद्याच्या दरवाढीपाठोपाठ आता इतर भाज्याही महागल्या आहेत. करोनामुळे आर्थिक गणित बिघडलेले असताना आता भाजीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

बोरिवली भाजी बाजारातील विक्रे त्याने दिलेल्या माहितीनुसार, पावसापूर्वीचे भाज्यांचे घाऊक दर आणि सध्याचे घाऊक दर यात बरीच मोठी तफावत आहेत. यात ग्राहकांसोबतच भाजी विक्रे त्यांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसापूर्वी फरसबी, पापडी, फ्लॉवर, गवार, शिमला मिरची यांचे घाऊक बाजारातील दर प्रतिकिलो ८० रुपये होते. त्यानंतर मालाची आवक घटली आणि हे दर अनुक्रमे १२०, १००, १००, १२०, १०० रुपये प्रतिकिलो झाले. भाजी विक्रे त्यांना कोबी आणि गाजर प्रतिकिलो ५० रुपये दराने खरेदी करता येत होते. हे दर अनुक्रमे ३० आणि २० रुपयांनी वाढले. टोमॅटो ३० रुपयांवरून ४० रुपये, भेंडी ६० रुपयांवरून ८० रुपये, वांगे ४० रुपयांवरून ७० रुपये प्रतिकिलो घाऊक दरापर्यंत पोहोचले आहे. सध्या घाऊक ६४ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी तिखट मिरची बोरिवलीच्या किरकोळ बाजारात ८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. ‘घाऊक बाजारात असणाऱ्या दरात १०-२० रुपये वाढ करून किरकोळ बाजारात भाज्या विकल्या जातात. सर्वसाधारण परिस्थितीत प्रत्येक भाजी १० ते १५ किलो रोज विकली जाते. मात्र, करोनाच्या भीतीने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. शिवाय भाज्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दिवसाला ५ किलो भाजी विकतानाही नाकीनऊ येत आहेत’, असे बोरिवली भाजी बाजारातील विक्रे ते प्रदीप मोरया यांनी सांगितले.

दादर येथील किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो १०० रुपये आहे, तर बटाटे ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. ‘पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने बाजारात मालाची आवक घटली आहे. सध्या नेहमीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुढील महिनाभर दर चढेच राहतील,’ असे दादरच्या बाजारातील विक्रेते सचिन रावडे यांनी सांगितले.

दादरच्या बाजारातील दर (किलोमागे रुपयांत)

भाजी         घाऊक              किरकोळ

मटार          १२० ते १३०         १६०

फ्लॉवर         ६० ते ७०               १००

कोबी          ६०                          १००

भेंडी           ७०                          ८०

फरसबी        ७०                         १००

गवार          ८०                  ११० ते १२०

बटाटे          ४५                        ५०

कांदे           ८५ ते ९०              १००

टॉमेटो         ४५                     ५५ ते ६०

कोथिंबीर जुडी    १२                   २०

मेथी       १२ ते १५                      ३०

पापडी          ७०                      १००

वांगे           ७०                         १००

गाजर          ६५ ते ७०             १२०

गवार          ७० ते ८०            १००

शि.मिरची      ७० ते ८०         ९० ते १००

मिरची        ८० ते ९०            १००