शेतकऱ्यांच्या संपामुळे मॉल, डिपार्टमेन्टल स्टोअर्समधून भाजीपाला गायब झाला आहे. संपकाळात या स्टोअर्समध्ये मागणीच्या निम्मा भाजीपालाही पोहोचलेला नाही. येणारा मालही दुय्यम दर्जाचा किंवा खराब असल्याची तक्रार ग्राहक करतात.

‘बिग बाजार’, ‘रिलायन्स स्मार्ट’, ‘डी मार्ट’ या आधुनिक बाजारपेठांमध्ये शनिवारी कोथिंबीर, टॉमेटो, कांद्यासह पालेभाज्या आल्याच नाहीत. चुनाभट्टी येथील ‘रिलायन्स फ्रेश’मधून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकसह अन्य भागातून येणारा भाजीपाला भिवंडी येथून शहरातील सर्व शाखांमध्ये पुरवला जातो. त्यासाठी प्रत्येक शाखेकडून मागणीनुसार रोजच्या रोज किती भाजीपाला आवश्यक आहे याची यादी पाठवावी लागते. या शाखेतून दोनशे ते अडीचशे टोपल्या भाजीपाला रोज विकला जातो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शंभर किंवा त्याहून कमी टोपल्यांमधून भाजीपाला शाखेत आला. एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टॉमेटो, कांदा, कोथिंबिरीसह पालेभाज्या संपामुळे येऊ शकलेल्या नाहीत. किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोने शंभरी पार केलेली आहे. ग्राहक आशेने आमच्या शाखेत टोमॅटोसाठी आले होते. मात्र मालच नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

शनिवारी पुरवठा खंडीत

चेंबूरच्या ‘बिग बजार’मध्ये भाजीपाला विभागात दोडकी, वांगी, फरसबी, कारली, गाजर, बीट इतकाच भाजीपाला होता. ‘रिलायन्स स्मार्ट’प्रमाणे ‘बिग बाजार’मध्येही कोथिंबिरीचा ट्रे रिकामा होता. ‘बिग बाजार’मधील एका कर्मचाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे मंचरहून भाजीपाला येतो. आमच्या गोदामातून मागणीप्रमाणे भाजीपाला घेऊन रोजच्या रोज गाडी येते. शनिवारी गाडी आलीच नाही. त्यामुळे कालचा शिल्लक माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

‘डी मार्ट’ने दीडेक महिन्यांपासून पालेभाज्या किंवा लवकर खराब होणारा भाजीपाला विकणे बंद केल्याची माहिती मुलुंड शाखेतून देण्यात आली. या ठिकाणी काकडी, शिमला मिरची, हिरवी मिरची, कारली, भोपळा, वांगी, दुधी, तोंडली असा किमान चार ते पाच दिवस टिकेल असा भाजीपाला विकला जातो. शनिवारी यापैकी काही भाज्या ‘डी मार्ट’मध्ये उपलब्ध नव्हत्या.

येथील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माफक भावामुळे आमच्याकडे येणारा ग्राहक कांदे-बटाटय़ांवर तुटून पडतो. काही किरकोळ विक्रेतेही मोठय़ा प्रमाणावर येथून माल नेतात. पण दोन दिवसात कांदे-बटाटे आलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त पाच किलो कांदे, बटाटे विकण्यास सुरुवात केली आहे.

पुरवठय़ाअभावी भाज्या भडकल्या

शनिवारी दादर व भायखळ्यातील भाजी मंडईत अपेक्षेपेक्षा खूप कमी पुरवठा झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात भाजी घेणाऱ्या हॉटेल, लग्नसमारंभ, रुग्णालये, आश्रम यांची पंचाईत झाली. भायखळ्याच्या भाजी मंडईत दररोज १५० ट्रक भाजीची आवक होते. मात्र शनिवारी केवळ ५० ट्रक भाज्या मंडईत आले होते. त्यातही मेथी, कांद्यांची पात, लाल माठ, कोथिंबीर, पुदिना यांची आवक अतिशय कमी होती. त्यामुळे या भाज्या दुपापर्यंत संपल्या होत्या. शनिवारीही कोथिंबीरची जुडी १५० ते २०० रुपयांनी विकली जात होती. टोमॅटो १२० रुपये किलोने विकला जात होता, तर कारली ७० रुपये किलो, मटार १२० रुपये किलो, शिमला मिरची १२० रुपये किलो, फरसबी ८० रुपये किलो, भेंडी ५० रुपये आणि कोबी ४० रुपये किलोने विकला जात होता.

रविवारी भाव गडगडणार?

शनिवारी पहाटे काही भागांतील संप मागे घेतल्यानंतर रविवारी मोठय़ा प्रमाणात भाज्यांची आवक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भाज्यांचे चढलेले भाव खाली उतरण्याची शक्यता दादर भाजी मंडईतील विक्रेत्यांनी व्यक्त केली. रविवारी आवक जास्त झाली तर भाव खाली उतरण्याची शक्यता आहे, असे दादर मंडईतील विक्रेता सूरज पाटील यांनी सांगितले.