News Flash

भाज्या, डाळी महाग…

एप्रिल, मे महिन्यांच्या कालावधीत उन्हाच्या तीव्र झळांमुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान होऊन त्याचे उत्पादन कमी प्रमाणात होत असते.

(संग्रहित छायाचित्र)

अवकाळी पावसाचा परिणाम; अपुरा पुरवठा

ठाणे : राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, बाजारात त्यांची आवक घटली असून घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात २ ते ६ रुपयांनी, तर किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, भाज्यांपाठोपाठ डाळींच्या दरातही वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या महिन्यात पापड, कुरडया करण्यासाठी डाळींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या दरातही वाढ झाली असल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

एप्रिल, मे महिन्यांच्या कालावधीत उन्हाच्या तीव्र झळांमुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान होऊन त्याचे उत्पादन कमी प्रमाणात होत असते. त्यात, यंदा राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे  नुकसान झाले आहे. त्यामुळे वाशी, मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवकही कमी प्रमाणात होत आहे. परिणामी, त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे किरकोळ भाजी विक्रेत्यांनी सांगितले. घाऊक बाजारात पूर्वी ३० रुपये प्रति किलोने विकली जाणारी भेंडी सध्या ३४ रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

३८ रुपये प्रति किलोने विकली जाणारी फरसबी ४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे, तर ४५ रुपये किलोने विकली जाणारी गवार सद्य:स्थितीत ५० रुपये किलोने विकली जात आहे. तसेच किरकोळ बाजारात ६० रुपये प्रति किलोने विकल्या जाणाऱ्या भेंडी, गवार, फरसबी या भाज्या सध्या ८० रुपये प्रति किलोने विकल्या जात

आहेत, तर भाज्यांपाठोपाठ डाळींच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या कालावधीत पापड, कुरडया बनविण्यासाठी डाळींना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत डाळींची आवक होत नसल्याने त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घाऊक बाजारात डाळींचे दर ५ ते १२ रुपयांनी, तर किरकोळ बाजारात ६ ते १० रुपयांनी वधारले आहेत.

टाळेबंदीच्या भीतीने खरेदी

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने टाळेबंदी जाहीर होईल या भीतीने वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल महिन्याच्या ११ ते १५ तारखेच्या मध्ये ९१ हजार क्विंटल शेतमाल मागविला. तसेच टाळेबंदीच्या भीतीमुळे  मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील किरकोळ विक्रेत्यांनी आणि नागरिकांनीही हा शेतमाल मोठ्या प्रमाणात खरेदी केला. त्यामुळे सद्य:स्थितीला वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला केवळ १२ ते १६ हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल होत आहे. सध्या ही आवक पुरेशी नसल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 1:20 am

Web Title: vegetables pulses are expensive akp 94
Next Stories
1 अभिनेते मेजर विक्रमजीत कंवरपाल यांचे निधन
2 आंबे,अंडी, मटणविक्रीस सकाळी ११ पर्यंत मुभा
3 ‘सीबीएसई’चा दहावीचा निकाल २० जूनपूर्वी
Just Now!
X