शीव उड्डाणपूल चार दिवस दुरुस्तीसाठी बंद

मुंबई : शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सुरू झाल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळच्या वेळेत वाहनांची गर्दी कमी असल्याने वाहतुकीवर फारसा ताण नव्हता. दुपारनंतर मात्र वाहनांची संख्या वाढल्याने शीव, सुमननगर, किंग्ज सर्कल, कुर्ला एल. बी. एस. मार्ग परिसरातील वाहतूक मंद गतीने सुरू होती.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शीव उड्डाणपुलाच्या बेअरिंग बदलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे ६ एप्रिलपर्यंत दर आठवडय़ाला चार दिवस उड्डाणपूल बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी या कामाला सुरुवात झाली. सध्या उड्डाणपुलाच्या चुनाभट्टीकडील बाजूकडून काम सुरू झाले आहे. पूल बंद केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अधिकचा फौजफाटा वापरत वाहतूक नियंत्रणात आणली. सकाळी ११ पर्यंत सुरळीत असलेली वाहतूक दुपारी १ दरम्यान मंदावत गेली. दुपारनंतर मात्र कुल्र्याच्या एल.बी.एस. मार्गावर थोडीफार वाहतूक कोंडी झाली. दादर-पनवेल महामार्गावरून चेंबूरकडे जाणाऱ्या गाडय़ा आणि धारावीतून चेंबूरकडे जाणाऱ्या गाडय़ा शीव उड्डाणपुलाखाली एकत्र येत असल्याने तेवढय़ा टप्प्यात विशेष वाहतूक कोंडी जाणवत होती. त्यामुळे प्रतीक्षानगर, राणी लक्ष्मीबाई चौक येथून मुंबईबाहेर पडणाऱ्या गाडय़ांनाही या कोंडीचा सामना करावा लागला. परिणामी सायंकाळी गर्दीच्या वेळेत दादर-पनवेल महामार्गाच्या दोन्ही मार्गिका तसेच शीव, सुमननगर, किंग्ज सर्कल, कुर्ला एल.बी.एस. मार्गावरील वाहतुकीवर ताण आला. परंतु वाहतूक पोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नाही.

रात्री वाहतूक कोंडी

कामावरून सुटणारा कर्मचारी वर्ग आणि गर्दीची वेळ यामुळे सायंकाळी ७ नंतर दादर ते चेंबूर दरम्यान दोन्ही मार्गांवर आणि कुर्ला एल. बी. एस. मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमुळे दादर- शीव अंतर पार करण्यासाठीही तारभर वेळ लागत होता. बराच वेळ गाडय़ा पुढे सरकत नसल्याने अनेक प्रवाशांनी बसमधून उतरुन पायी जाण्याचा पर्याय स्वीकारला.

सुट्टय़ांचे दिवस कसरतीचे

धिम्या गतीने सुरू असलेल्या वाहतुकीमुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांना शीवदरम्यान दहा ते पंधरा मिनिटे थांबावे लागत होते. वाहतूक नियंत्रणासाठी ५९ अंमलदार, २५ वॉर्डन आणि ३ अधिकारी अशी अधिकची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. पहिल्या दिवशी वाहतूक नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी पुढचे तीन दिवस सुट्टय़ांचे असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.