अपघात झाल्यासही तात्काळ मदत, प्रवाशांना आगमन व निर्गमनही समजणार

एखाद्या चालकाने थांबा चुकवल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई करणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. एसटीत मंगळवारपासून वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याद्वारे चालकाने थांबा चुकवल्यास त्याची माहिती महामंडळाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे एसटीचे आगमन व निर्गमन समजण्याबरोबरच अपघात झाल्यास तात्काळ मदत पोहोचवणेही शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

मंगळवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे लोकार्पण झाले.  एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रणालीच्या नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. राज्यातील ३,६०० बसगाडय़ांना प्रणाली बसवण्यात आली असून सुरुवातीला ९४५ गाडय़ांमध्ये ती कार्यरत केली आहे. प्रणालीच्या मदतीने २३ बस स्थानकात बसवण्यात आलेल्या एलसीडी टीव्ही संचावर प्रवाशांना एसटी गाडय़ांच्या येण्याची व सुटण्याची वेळ समजणार आहे. तसेच त्यांची येण्याची व सुटण्याची अपेक्षित वेळही दाखवली जाईल.

निश्चित केलेल्या वेळेत बस पोहोचवण्यासाठी एसटी चालकांकडून काही वेळा बस थांबे चुकवले जातात. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. आता तसे झाल्यास या प्रणालीमार्फत स्थापन झालेल्या नियंत्रण कक्षात ते दिसेल. त्यानुसार त्वरित पुढील कार्यवाही चालकावर करणे सोप्पे जाईल, असे सांगण्यात आले. अपघात झाल्यावरही त्याची माहिती मिळेल आणि मदत पोहोचवणे शक्य होणार आहे. नाशिक विभागातील साध्या व शिवशाही गाडय़ांबरोबरच मुंबई ते पुणे शिवनेरी, बोरिवली ते पुणे ते बोरिवली, ठाणे ते पुणे ते ठाणे शिवनेरी गाडय़ांना ही प्रणाली बसवली आहे.

एक महिन्यात मोबाइल अ‍ॅप

एसटी एक मोबाइल अ‍ॅपही बनवणार असून व्हीटीएस प्रणालीद्वारे अ‍ॅपवरही प्रवाशांना माहिती मिळणार आहे. साधारण एक महिन्यांनी हे अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत येईल. त्याचप्रमाणे पाच ते सहा महिन्यांत एसटीच्या सर्व बसगाडय़ांना व्हीटीएस प्रणाली बसवण्याचे काम पूर्ण केले जाईल. प्रणाली बसवण्यासाठी साधारणपणे ३२ कोटी ५४ लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले.

..तीन दिवसांची वेतन कपात

एखादी गाडी नियोजित वेळेत न पोहोचल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर नवीन प्रवासी माहिती प्रणालीमुळे नियमानुसार कारवाई करण्यात मदत मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर आता निलंबनाऐवजी तात्काळ तीन दिवसांचे वेतन कापण्याचा विचार केला जात असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.