सकाळी ९ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२ दरम्यान सर्वाधिक अपघात

सकाळी आणि संध्याकाळी म्हणजेच नोकरदारांच्या कार्यालय व घर गाठण्याच्या वेळांमध्ये अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील अपघातांचा वेळेनुसार आढावा घेतला असता सकाळी ९ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष परिवहन आयुक्त कार्यालयाने काढला आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी ‘ते’ १२ तास जीवघेणे ठरत आहेत.

राज्यातील अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५,७१७ वरून ३०,०८० असे घटले आहे. परंतु, अपघातांचे प्रमाण शून्यावर आणायचे असेल तर वाहतुकीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच, अपघाताच्या कारणांचे योग्य विश्लेषणही होणे गरजेचे आहे. म्हणून परिवहन विभागाने महामार्ग पोलिसांकडून प्राप्त झालेली अपघातांची आकडेवारी, घटनाक्रम आणि त्यांच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण केले. त्यानुसार २४ तासांमधील ठराविक १२ तासांतच सर्वाधिक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळी ९ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अपघातांचे प्रमाण अधिक आढळून आले. हे प्रमाण कमी करण्याकरिता या वेळांमध्ये विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील आरटीओंना त्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. ज्या भागातून राष्ट्रीय, राज्य महामार्ग अथवा जिल्ह्यतील प्रमुख रस्ता जातो, अशा ठिकाणी अधिक काळजी घेण्यात येणार आहे. याठिकाणी त्या १२ तासांमध्ये वाहन तपासणी केली जाईल. पादचारी व दुचाकीस्वार, सायकलस्वार, शालेय विद्यार्थी, बैलगाडी, हातगाडी, ट्रॅक्टर चालक व इतर घटकांसाठी पुरेशा प्रमाणात रस्ता सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत. रस्त्यावरुन जाताना अथवा रस्ता पार करताना कोणता धोका आहे याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे. याशिवाय रस्त्यांचा सुरक्षा अहवाल तयार करण्याचेही निर्देश दिले आहेत.