आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही अक्षय्यतृतीयेनिमित्त मुंबईकरांनी काही प्रमाणात का होईना, वाहनांची नोंदणी केली आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्तावर दरवर्षी अक्षय्यतृतीयाला वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. यंदाही एका दिवसात चारचाकी आणि दुचाकी अशा दोन्ही मिळून सुमारे ६३७ वाहनांची नोंद झाली असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक म्हणजे ७० ते ७५ टक्के दुचाकी वाहनांची खरेदी झाली असल्याचे सांगण्यात आले.

गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकल्यानंतर अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त ग्राहकांकडून हमखास गाठला जातो. यंदाही काही प्रमाणात वाहनांची खरेदी झाल्याचे पाहायला मिळाली.  नवी कोरी गाडी दारात यावी, यासाठी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर वाहनांची नोंदणी केली जाते. यंदाही वाहन नोंदणीचा हा कल पाहायला मिळाल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

सेन्सेक्सची ‘अक्षय’ झेप

सोने खरेदीसाठी एक असलेला मुहूर्त सोमवारी भांडवली बाजारासाठीदेखील सकारात्मक ठरला. ४६० अंशांच्या रुपात गेल्या महिन्याभरातील एकाच सत्रातील सर्वात मोठी झेप नोंदवित सेन्सेक्सने नव सप्ताहारंभी २५,७०० नजीकची मजल मारली. तर १३२.६० अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८६६.०५ वर पोहोचला. शतकाहून अधिक अंश वाढीने निफ्टीला ७,९०० नजीकची मजल सोमवारी मारता आली.

सोनेखरेदीत १० टक्क्य़ांनी वाढ

सरकारच्या उत्पादन शुल्कविरोधातील सलग ४२ दिवसांच्या बंदमुळे हुकलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त सोमवारी सराफांच्या पथ्यावर पडला. अक्षय तृतियेच्या निमित्ताने सोने मागणीत दुहेरी आकडय़ांची वाढ नोंदली गेल्याचे मानले जात आहे.गेल्या अक्षय तृतियेच्या तुलनेत यंदाच्या मुहूर्तावर सोने खरेदीदारांकडून १० टक्क्य़ांपर्यंतची मागणी नोंदविली गेली.