परिवहन आयुक्तांचे सर्व ‘आरटीओं’ना आदेश

मुंबई : मुंबईसह राज्यभरात वाढलेले जीवघेणे अपघात, डोंबिवलीतील कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा झालेला अपघाती मृत्यू या पाश्र्वभूमीवर वाहनांची चाचणी व तपासणी अधिक कठोरपणे करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

वाढत्या अपघातांचा विषय ‘लोकसत्ता’ने सातत्याने लावून धरला आहे. त्या पाश्र्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक आराखडा बनवण्याची सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना केली. याची दखल घेऊन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. यात वाहनचालकांची होणारी चाचणी, दिला जाणारा परवाना, व्यावसायिक वाहनांचीही होणारी तपासणी इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा झाली.

बैठकीत वाहनचाचणी व तपासणी अधिक कठोरतेने करण्याचे आदेश आरटीओंना देण्यात आले. ही तपासणी झाल्यानंतरही त्यातील काही ठरावीक वाहनचालकांची पुनर्चाचणी किंवा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत.

परिवहन आयुक्त चन्ने यांनी सांगितले की, ‘वाढते अपघात पाहता अधिक कठोरतेने आरटीओतील वाहनचाचणी आणि तपासणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचा आढावाही घेण्यात येणार आहे.’

२०१८ मध्ये राज्यात एकूण ३५ हजार ७१७ अपघात झाले असून यात १३ हजार २६१ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर २० हजार ३३५ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. तसेच डोंबिवलीत राहणाऱ्या जान्हवी मोरेचा शिळफाटा रस्त्यावरील पलावा बस थांबा येथे रस्ता ओलांडताना ट्रकने उडवल्याने मृत्यू झाला. त्यामुळे वाहनचालकांना दिला जाणारा परवाना, अपघात रोखण्यासाठी संबंधित सरकारी यंत्रणांचे अपयश यातून समोर आले.

जान्हवी मोरेच्या अपघाताचे नेमके कारण उलगडणार..

जान्हवी मोरे हिच्या अपघाताच्या नेमक्या कारणांचाही उलगडा होणार आहे. राज्यातील होणाऱ्या अपघातांचा आढावा घेतानाच त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी परिवहन विभागाकडून नुकताच एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. त्यांच्याकडून जान्हवीच्या अपघाताचा तपास केला जाणार असल्याचे परिवहन आयुक्त चन्ने यांनी सांगितले. त्यातून तिच्या अपघाताचे मूळ कारण समोर येईल.

‘लोकसत्ता’तील अग्रलेखाची दखल

‘अपघात निर्देशांक’ या ‘लोकसत्ता’तील अग्रलेखाद्वारे राज्यातील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असलेल्या सरकारी यंत्रणांच्या कामकाजावर बोट ठेवण्यात आले. त्याची दखल घेत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन आयुक्तांना अपघात, त्याचे नेमके कारण, ते कमी करण्यासाठी होणारे प्रयत्न, वाहनतपासणी, परवाना वाटप इत्यादींचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.