पालिकेची २६, तर ‘बेस्ट’च्या वाहनतळांची माहिती देणारे मॉडय़ूल कार्यान्वित

कामाच्या ठिकाणी वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना आपले वाहन उभे करण्याकरिता संबंधित परिसरातील उपलब्ध वाहनतळांची माहिती आता अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनतळासाठी चालकांना गल्लोगल्ली चकरा मारण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. वाहनतळाचे ठिकाण आणि त्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारे ‘मॉडय़ूल’ पालिकेच्या अ‍ॅपवर सोमवारी कार्यान्वित करण्यात आले.

पालिकेच्या ‘टउॅट 24७7’ या मोबाइल आधारित अ‍ॅपमध्येच उपलब्ध करण्यात आलेल्या या मॉडय़ूलच्या माध्यमातून वाहनचालकास ५०० मीटर आणि पाच कि.मी. परिघात पालिका, बेस्टच्या वाहनतळाची माहिती मिळेल. तसेच वाहनतळापर्यंत जाणारा मार्गही वाहनचालकास कळेल.

मुंबईमधील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आसपासच्या शहरातून मोठय़ा संख्येने नागरिक आपल्या वाहनाने मुंबईत कामानिमित्त येत असतात. ही वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे वाटेल तिकडे ती उभी करून वाहनमालक कामास निघून जातात. अशा वाहनांचा पादचारी आणि वाहतुकीला अडथळा होतो. वाहनचालकांना वाहनतळांची माहिती मिळावी यासाठी मोबाइल आधारित अ‍ॅपमध्ये मॉडय़ूल कार्यान्वित करण्याची घोषणा पालिकेने काही वर्षांपूर्वी केली होती. अखेर पालिकेच्या अ‍ॅपवर हे मॉडय़ूल कार्यान्वित करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहनतळांबाबत सर्वसमावेशक नियोजन व व्यवस्थापन करता यावे यासाठी पालिकेने मुंबईच्या ‘विकास आराखडा २०३४’मधील तरतुदीनुसार ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरणा’ची स्थापना केली आहे. या प्राधिकरणातर्फे वाहनतळविषयक विविध बाबींचा अभ्यास आणि उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे. मुंबई वाहनतळ प्राधिकरण आणि पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञानाने ‘kMCGM 24x7l’ या मोबाइल आधारित अ‍ॅपमध्ये वाहनतळविषयक स्वतंत्र मोडय़ूल तयार केले आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिका आणि बेस्टच्या वाहनतळांची माहिती

‘प्ले स्टोअर’वर पालिकेचे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये ते डाउनलोड केल्यास वाहनतळांची माहिती त्यावर उपलब्ध होऊ शकेल. या अ‍ॅपवरील मॉडय़ूलवर वाहनचालकांना ५०० मीटर आणि ५ कि.मी. परिघातील वाहनतळ नकाशाच्या रूपात दिसतील. त्याचबरोबर वाहनतळाचा पत्ता, कामकाजाची वेळ, वाहनतळाची क्षमता आदी माहितीचाही त्यात समावेश असेल. याव्यतिरिक्त सशुल्क वाहनतळावर वाहन उभे करण्यासाठी किती शुल्क आकारणार याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. वाहनतळापर्यंत कसे पोहोचावे याचा मार्गही त्याच्या माध्यमातून वाहनचालकाला समजू शकेल. तूर्तास अ‍ॅपवर मुंबईतील २६ सार्वजनिक वाहनतळांसह बेस्टच्या अखत्यारीतील वाहनतळांचा समावेश या मॉडय़ूलवर करण्यात आला आहे.