करोना संकटाचा फटका

मुंबई: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी सोने खरेदीबरोबरच वाहन खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते; परंतु यंदा करोना संकटामुळे वाहन खरेदीला उतरती कळाच लागल्याचे दिसत आहे. मुंबईतील चार आरटीओत केवळ २३८ चारचाकी आणि दुचाकी वाहनांची नोंदणी झाली असून यात ८१ दुचाकी आणि १५७ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

ताडदेव आरटीओत ५८ चारचाकी व २७ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. यातून १ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल मिळाला. वडाळा आरटीओतही २० दुचाकी आणि ३० चारचाकी वाहने, अंधेरी आरटीओत ७ दुचाकी, तर ३५ चारचाकी आणि बोरिवली आरटीओत २७ दुचाकी आणि ३४ चारचाकी वाहनांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. सध्या करोनाच्या निर्बंधामुळे वाहनांची शोरूम्स सुरू ठेवण्याचा कालावधी कमी झाला आहे. शिवाय काही शोरूम्स बंदच असतात. तसेच अनेकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नोंदणी मोठ्या प्रमाणात होऊ शकली नसल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी १५ मे २०२१ ला राज्य सरकारने नव्याने दिलेल्या आदेशांपूर्वी ज्या वाहनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, तसेच यापुढे विक्री होणाऱ्या वाहनांची नोंदणी त्वरित व्हावी, अशी मागणी राज्यातील वाहन वितरकांकडून करण्यात येत होती. टाळेबंदीमुळे त्याच्या नोंदणीत व त्यापुढे वाहने रस्त्यावर येण्यास अडचणी येत असल्याने भारत स्टेज-६ या मानकाच्या विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी ऑनलाइनच करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने तीन दिवसांपूर्वीच घेतला.

यात नोंदणी अधिकाऱ्याच्या समक्ष वाहन सादर करण्याची गरज नसल्याचे आयुक्त कार्यालयाने स्पष्ट के ले होते व ऑनलाइन सर्व कागदपत्रे सादर करण्यास वितरकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरटीओकडूून नोंदणी करण्यात आली. नवीन प्रकारे वाहन नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आरटीओतील कर्मचाऱ्यांचा काहीसा गोंधळ उडाला.

गेल्या वर्षी अक्षय्यतृतीया २६ एप्रिल २०२० ला आली होती. त्या दिवशी रविवार आणि करोनामुळे टाळेबंदी असल्याने वाहन नोंदणी होऊ शकली नव्हती. जून २०२० पासून आरटीओ कार्यालये सुरू झाली.

आरटीओचा महसूल घटला

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लागू करण्यात आलेले निर्बंध यांचा फटका राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही (आरटीओ) बसला. करोनाची धास्ती आणि टाळेबंदी यामुळे एप्रिल २०२१ मध्ये वाहन खरेदीत लक्षणीय घट झाली. वाहन नोंदणी कमी झाल्याने त्याद्वारे आरटीओला मिळणारा महसूलही कमी झाला. मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात राज्याच्या आरटीओच्या महसुलात ४४४ कोटी रुपयांपेक्षाही अधिक घट झाली आहे. यात मुंबई महानगरातील वाहन नोंदणीत निम्म्याहून अधिक घट झाली. राज्यात मार्च २०२१ मध्ये १ लाख ८७ हजार ५४३ वाहनांची नोंदणी झाली होती, तर २५ हजार परमिट (परवाना) दिले गेले. एप्रिल महिन्यात ७२ हजार ९५१ वाहनांची नोंदणी होतानाच ९ हजार ७७७ परवाने दिले.