राज्यात सोमवारपासून अंमलबजावणी; वाहन मालकांनाही दिलासा

नवीन वाहनांना आता वहनयोग्यता चाचणी (फिटनेस) ही दोन वर्षांनंतर करता येणे शक्य होणार आहे. याबाबत केंद्र सरकारनेच कायद्यात बदल केले असून त्याची राज्यात सोमवारपासून अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे नवीन वाहन घेणाऱ्या चालक-मालकांना दिलासा तर मिळेलच, मात्र त्या वाहनाची योग्यताही व्यवस्थितरीत्या तपासली जाईल.

सध्या नवीन वाहनांची नोंदणी होण्यापूर्वी त्याला वहनयोग्यता चाचणी द्यावी लागते. त्यानंतर प्रमाणपत्र मिळताच वाहनाची नोंदणी होऊन ते रस्त्यावर धावू शकते. दोन वर्षांपर्यंत ही चाचणी होतानाच त्यानंतर प्रत्येक वर्षी चाचणी द्यावी लागत आहे.

याआधी प्रमाणपत्र देण्याचे काम हे उत्पादन कंपन्यांकडून केले जात असे. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन विभागाकडून नवीन वाहनांना त्यांची नोंदणी होण्यापूर्वी त्वरित वहनयोग्यता चाचणी घेण्यास सुरुवात केली. परंतु केंद्र सरकारने नवीन वाहन घेणाऱ्या मालकांना दिलासा देण्यासाठी मोटार वाहन नियमांत आणखी काही बदल केले आहेत. बदल केलेल्या नियमानुसार, नवीन वाहनांचीही नेहमीप्रमाणे नोंदणी केली जाईल. वाहन रस्त्यावर येताच दोन वर्षांनंतर त्याची वहनयोग्यता चाचणी करता येणार आहे. त्या वाहनांची वयोमर्यादा आठ र्वष होईपर्यंत त्या वाहनाला दर दोन वर्षांनी ही चाचणी द्यावी लागेल.

आठ वर्षे पूर्ण होताच त्यानंतर प्रत्येक वर्षी चाचणी द्यावी लागणार असल्याचे नमूद करण्यात आल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे याआधी नवीन वाहनांची नोंदणी होण्यापूर्वी ज्या किचकट प्रक्रियेतून चालक-मालकाला जावे लागत होते त्यातून सुटका मिळणार आहे. राज्यात या नियमाची सोमवारपासून अंमलबजावणी केली जाईल.