News Flash

मुंबई महानगर क्षेत्रात वाहन नोंदणी निम्म्यावर

वाहन उद्योगक्षेत्रासह ‘आरटीओ’लाही टाळेबंदीचा फटका; महसुलात घट

वाहन उद्योगक्षेत्रासह ‘आरटीओ’लाही टाळेबंदीचा फटका; महसुलात घट

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि गेले महिनाभर लागू करण्यात आलेले निर्बंध यांचा परिणाम विविध उद्योगक्षेत्रांवर दिसत असताना राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही (आरटीओ) याचा फटका बसला आहे. करोनाची धास्ती आणि टाळेबंदी यांमुळे एप्रिल महिन्यात वाहनखरेदीत लक्षणीय घट झाली असून वाहननोंदणी कमी झाल्याने त्याद्वारे आरटीओला मिळणारा महसूलही कमी झाला आहे.  विविध करांपोटी मिळणारी रक्कमही कमी आल्याने मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात राज्याच्या आरटीओच्या महसुलात ४४४ कोटी रुपयांपेक्षाही अधिक घट झाली आहे. यात मुंबई महानगरातील वाहन नोंदणीत निम्म्य़ाहून अधिक घट झाली आहे.

गेल्यावर्षी टाळेबंदी लागताच वाहन खरेदी कमी झाली. वाहन नोंदणीच होऊ न शकल्याने एप्रिल २०२० ते जून २०२० पर्यंत आरटीओच्या तिजोरीत खडखडाट होता. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर विविध कारणांमुळे वाहनखरेदीकडे ओघ वाढला. अनेकांनी वाहतुकीसाठी रेल्वे, परिवहन बस किं वा खासगी बस याचा पर्याय निवडण्याऐवजी दुचाकी, चार चाकी वाहन खरेदी करण्यावर भर दिला. त्यामुळे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत वाहन उद्योग क्षेत्र लवकर उभारी घेत होते. मात्र, एप्रिल महिन्यात वाढलेला करोनाचा संसर्ग आणि त्यानंतर लावण्यात आलेले निर्बंध यांमुळे या क्षेत्राची चाके पुन्हा रूतली आहेत. याचा परिणाम प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही भोगावा लागत आहे. राज्यातील वाहन खरेदी-विक्री थंडावली शिवाय विविध करांपोटी मिळणाऱ्या महसुलातही घट झाली आहे.

राज्यात मार्च २०२१ मध्ये १ लाख ८७ हजार ५४३ वाहनांची नोंदणी झाली होती. तर २५ हजार परमिट (परवाना)दिले गेले. एप्रिल महिन्यात ७२ हजार ९५१ वाहनांची नोंदणी  होतानाच ९ हजार ७७७ परवाने दिल्याचे सांगण्यात आले. वाहन नोंदणी कमी होतानाच विविध करांपोटी मिळणारी रक्कमही कमी झाली. त्यामुळे मार्च महिन्यात ७६८ कोटी ३२ लाख रुपये मिळालेले उत्पन्न एप्रिलमध्ये थेट ३२४ कोटी ४० लाखांपर्यंत गेले.

मुंबईतील ताडदेव आरटीओतील उत्पन्न २८ कोटी १५ लाखांनी, अंधेरी आरटीओचा २४ कोटी ७ लाखांनी आणि वडाळा आरटीओचा १८ कोटी १९ लाखांनी महसुल कमी झाला आहे. पाठोपाठ ठाणे आरटीओचा २१ कोटी २८ लाखांनी, पनवेल आरटीओचा महसुल १६ कोटी १० लाखांनी कमी झाल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय रत्नागिरी, पुणे यासह अन्य आरटीओचाही महसूलही कमी झाला आहे.

अन्य कामकाज थंड

राज्यातील निर्बंधांमुळे आरटीओतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ टक्के  के ली आहे. शिवाय वाहन योग्यता तपासणी शिवाय अन्य कामेही १४ एप्रिलपासून बंदच आहेत. वाहनांचे शोरुमही बंद असल्याने अन्य कामे आरटीओतील कामकाजही बंदच असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 2:59 am

Web Title: vehicle registration in mumbai metropolitan area fall due to lockdown zws 70
Next Stories
1 रमजानमधील खाद्यजत्रा यंदाही ओस
2 रुग्णालय आगीच्या अहवालास विलंब
3 ‘आता केंद्रानेच  मार्ग काढावा’
Just Now!
X