शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने पालिकेच्या विरोधातील संतापाला वाट करून देत, बदलापूरमधील रिक्षा, स्कूल बस, मिनी बस, टेम्पोसारख्या सर्व वाहनांनी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. शालेय बस वाहतूकही यातून वगळण्यात आली नसल्याने शहरातील शाळांनी एक दिवसांची सुट्टी जाहीर करून टाकली होती. वाहतूकदारांच्या या संपामुळे नागरिकांचेही हाल झाले होते.
शहरातील विविध संघटनांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदने देऊनही रस्त्यांची अवस्था सुधारत नसल्याने सोमवारी वाहतूकदारांनी कडकडीत बंद पाळला. या बंदची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश कानडे, आमदार किसन कथोरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेट घेऊन १५ डिसेंबपर्यंत रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. डिसेंबरच्या ३० तारखेपर्यंत काम सुरू झाले नाही तर या संघटनेसोबत उपोषणास बसण्याचा इशारा आमदार कथोरे यांनी दिला आहे. बदलापूर पालिकेत सध्या नगराध्यक्ष व उपनगराध्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या संघटनेला पालिका प्रशासन काय उत्तर देणार याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मुख्याधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.