News Flash

वाहनांच्या चाचणी पथासाठी तिवरांची कत्तल?

ब्रेक टेस्टिंग ट्रॅकसाठी वर्सोवा येथे निश्चित करण्यात आलेल्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात तिवरांचे जंगल आहे

(संग्रहित छायाचित्र)

अंधेरी आरटीओच्या भूखंड निवडीबाबत प्रश्नचिन्ह

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रस्तावित ब्रेक चाचणी पथ (टेस्टिंग ट्रॅक) उभारण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या भूखंडावर तिवरांचे जंगल असल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरण कायद्यानुसार तिवरांचे संरक्षण करण्याचे उच्च न्यायालयाचेच आदेश असतानाच तिवरांचे जंगल असलेला भूखंड निवडून अंधेरी आरटीओकडूनच न्यायालयाचा अवमान होत नाही का, असा सवाल केला जात आहे. मात्र भूखंडाची निवड केली असली तरी राज्याच्या सागरी हद्द व्यवस्थापन विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय ट्रॅक उभारला जाणार नाही, अशी भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे.

ब्रेक टेस्टिंग ट्रॅकसाठी वर्सोवा येथे निश्चित करण्यात आलेल्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात तिवरांचे जंगल आहे. तेथे २५० मीटर लांबीचा ट्रॅक व इतर सुविधा उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात तिवरांची कत्तल करावी लागणार आहे. अंधेरीतील भूखंडावर ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारणे शक्य नाही. तेथे २००६ मध्ये झालेल्या करारानुसार विकासकाने १६५ मीटर लांब वाहन चाचणी पथ प्रस्तावित केला होता. सध्या हा भूखंड अतिक्रमणामुळे जेमतेम २३५ मीटर इतक्याच लांबीचा आहे. तेथे २५० मीटर लांब ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारता येणार नाही, अशी भूमिका अंधेरी आरटीओने घेतली आहे. त्याऐवजी वर्सोवा येथील भूखंड निवडण्यात आला आहे. मात्र तेथील भूखंडावर असलेल्या तिवरांमुळे हा टेस्टिंग ट्रॅक वादात सापडला आहे. तिवरांचे संरक्षण करण्याबाबत उच्च न्यायालयाचेच आदेश असताना असा भूखंड अंधेरी आरटीओने निवडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. या भूखंडाऐवजी सात बंगला, मॉडेल टाऊन येथील गृहरक्षक दलाच्या मोकळ्या भूखंडाचा वापर करता आला असता, याकडे वर्सोव्यातील भूखंडाला विरोध करणाऱ्या कोळी महासंघाने लक्ष वेधले आहे.

ठाणे आरटीओला टेस्िंटग ट्रॅकसाठी नांदिवली येथे २६ एकर भूखंड शासनाने दिला होता. या भूखंडाच्या मालमत्ता पत्रकावर आरटीओचे नावही होते. परंतु हा भूखंड पुढे निवासी झाला आणि अध्र्या भूखंडावर झोपडपट्टी आली, याकडे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी लक्ष वेधले आहे. कर्वे यांच्या पाठपुराव्यामुळेच उच्च न्यायालयाने ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयांना अंतिम मुदत दिली होती. अन्यथा अवमान कारवाईला सामोरे जा, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

अंधेरी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या भूखंडावर २५० मीटर लांबीचा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक बांधता येणे शक्य नाही. याशिवाय अवजड वाहनांचा विचार केल्यास ही जागा अपुरी आहे. त्यामुळे वर्सोवा येथील भूखंड निश्चित केला आहे. याबाबत महाराष्ट्र सागरी हद्द व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यांनी तो मंजूर केल्यास पुढील कार्यवाही करता येईल. अंधेरी येथे वाहनचालक चाचणी केंद्र व वाहनतळ बांधले जाणार आहे.

अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पश्चिम विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 2:11 am

Web Title: vehicle test patha andheri rto mangroves
Next Stories
1 शहरात पाणी तुंबले नव्हते, तर साठले!
2 प्लास्टिक बंदीसाठी महापालिका तयार
3 कारागृहातून माहितीच्या अधिकारात अर्ज
Just Now!
X