मुंबई : ठकसेन लोकांना गंडा घालण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधून काढत असतात. बांगूर नगर पोलिसांनी अशाच दोन ठकसेनांना अटक केली आहे. पाच लाखांचा डिमांड ड्राफ्ट देऊन त्यांनी वाहन खरेदी केले, पण त्याच वेळी बँकेला हा डिमांड ड्राफ्ट चोरीला गेल्याचे सांगून तो रद्द करवून घेतला. त्यामुळे बँकेत हा डिमांड ड्राफ्ट वटविण्यासाठी गेलेल्या दुकानादाराला रिकाम्या हाताने परतावे लागले.
मालाड येथील जी थ्री मोटर्स या दुकानात दहा दिवसांपूर्वी दोन इसमांनी पुनर्विक्रीसाठी ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी सव्वा ५ लाख १६ हजारला विकत घेतली. सहा हजार रुपये टोकन रक्कम म्हणून दिली. उर्वरित ५ लाख १० हजार रुपयांचा एचडीएफसी बँकेचा डिमांड ड्राफ्ट दिला. त्यानंतर या दोघांनी बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट हरविल्याबाबत सांगितले. बँकेने डिमांड ड्राफ्ट रद्द केला आणि या ठकसेनांनी बँकेतील पाच लाख रुपये काढून घेतले. बांगूर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक फटांगरे यांनी बँकेतून या दोन्ही ठकसेनांचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून तपास केला आणि मालाडच्या पठाणवाडीतून त्यांना अटक केली.