वाहन चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील पाच जणांना मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ मोटारगाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
 शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यासाठी वाहन चोरी विरोधी पथकाने या टोळीचा माग घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र ही टोळी हाती लागत नव्हती. अखेर दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर या टोळीतील ५ जणांना अटक करण्यात आली. सलीमअली सय्यद, अजहर शेख, मैनुद्दीन पठाण, इरफान खान, मोहम्मद खान अशी या आरोपींची नावे आहे. त्याच्या गाडय़ा चोरण्याच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साहिल यांनी सांगितले की, पहाटे अडीच ते चारच्या सुमारस ही टोळी पार्किंमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ा चोरायची. त्यासाठी त्यांनी बनावट चावी बनविण्याचे विशिष्ट यंत्र दुबई आणि चीन मधून आणले होते. गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाज्याचे लॉक तोडून ते गाडीत शिरत. त्यानंतर या यंत्राच्या सहाय्याने बनावट चावी बनवून गाडी सुरू करून पसार होत. विशेष म्हणजे अवघ्या तीन मिनिटात ते गाडी चोरत असत.