28 September 2020

News Flash

अवजड वाहतुकीविरोधात गिरगावात जनक्षोभ

मेट्रो-३ आणि खासगी विकासकांची बांधकामे जोरात सुरू असल्याने गिरगावमध्ये अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते.

(संग्रहित छायाचित्र)

 

वाहनांची मोडफोड, तिघांना अटक

मेट्रो ३ आणि खासगी विकासकांच्या कामांमुळे वर्षभर वाहतूककोंडीने हैराण असलेल्या गिरगावातील नागरिकांच्या संतापाचा सोमवारी सकाळी उद्रेक झाला. आंदोलकांनी अवजड वाहनांच्या काचा फोडल्या. या प्रकरणी तिघा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

मेट्रो-३ आणि खासगी विकासकांची बांधकामे जोरात सुरू असल्याने गिरगावमध्ये अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. परिणामी, स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. रोजच्या वाहतूककोंडीने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केली. परंतु त्यांनी दाद न दिल्याने नागरिकांच्या संतापाची परिणती उद्रेकात झाली. या आंदोलनात शिवसेनाही उतरली होती.

मेट्रोच्या विरोधात घोषणा देत रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी उभ्या असलेल्या मेट्रोच्या अवजड वाहनांवर दगडफे क केली. त्यात वाहनांचे नुकसान झाले. ‘जोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद होत नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून तसे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,’ असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांपैकी तिघांना अटक केली. आंदोलकांविरोधात जमाव जमवून दंगल माजवणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे आणि एखाद्याच्या जीवावर बेतेल असे कृत्य, या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गिरगावातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात अवजड वाहनांची वाहतूक अहोरात्र सुरू असते. त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना सोसावा लागतो. अनेकदा सकाळी आणि संध्याकाळीही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे सकाळी कामावर निघालेले आणि संध्याकाळी घरी परतणारे नोकरदार वाहतूक कोंडीत अडकतात. वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांच्या बसगाडय़ांचाही खोळंबा होतो.

वाहतूक कोंडीच्या रोजच्या त्रासाविरोधात मेट्रो, खासगी विकासक, पालिका, पोलीस आदी यंत्रणांकडे दाद मागितली. परंतु त्यांनी दखलही घेतली नाही, असे काही नागरिकांनी सांगितले. मेट्रो ३ आणि खासगी विकासक ‘डी. बी.’ यांच्या विरोधात निदर्शने केली.

या आंदोलनात नंतर सेनेचे स्थानिक पदाधिकारीही सहभागी झाले, असे सांगण्यात आले. अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले आहेत. तसेच आवाज आणि सततच्या गोंगाटामुळे जगणे कठीण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.

नियमांची ऐशीतैशी:

मुंबई वाहतूक नियंत्रण कायदा, १९८८तील कलम ११५ नुसार दक्षिण मुंबईतील वाहतूक नियमनासाठी सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आहे. परंतु, मेट्रोच्या आणि विकासकाच्या कामांमुळे या भागात वेळी-अवेळी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. स्थानिकांनी या वाहतुकीवर नियंत्रणाची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 2:34 am

Web Title: vehicle vandalism three arrested akp 94
Next Stories
1 त्रुटी असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना मोकळे रान
2 नुकसान भरपाईची रक्कम दोन दिवसांत न्यायालयात जमा करा
3 शेतकऱ्यांसाठी केंद्राचे अर्थसहाय्य मिळण्यात अडचणी
Just Now!
X