05 March 2021

News Flash

विसर्जनस्थळी खासगी वाहनांची गर्दी

नियोजनाअभावी गिरगाव चौपाटीवर बस, टेम्पो, जीपमुळे व्यत्यय

नियोजनाअभावी गिरगाव चौपाटीवर बस, टेम्पो, जीपमुळे व्यत्यय

दीड दिवस आणि गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी मोठय़ा संख्येने खासगी वाहने गिरगाव चौपाटीमध्ये दाखल झाल्याने गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यंत्रणेवर ताण पडत असतानाही वाहनांना अटकाव करण्यासाठी वाहतूक वा स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. परिणामी, गिरगाव चौपाटीमध्ये वाहनांची गर्दी झाली होती. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या हतबलतेमुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत होता.

दरवर्षी कुलाब्यापासून लालबाग, परळ परिसरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि रहिवाशी मोठय़ा संख्येने गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीमध्ये येत असतात. दीड दिवस, पाचवा दिवस आणि गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पालिका, सामाजिक संस्था आणि पोलिसांकडून गिरगाव चौपाटीमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. यंदाही भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र यंदा गणेश विसर्जनासाठी भाविक मोठय़ा संख्येने खासगी वाहने घेऊन गिरगाव चौपाटीमध्ये दाखल झाले होते. एका वाहनात गणेशमूर्ती आणि अन्य दोन-तीन वाहनांमध्ये भाविक बसून चौपाटीमध्ये येत होते. ही सर्व खासगी वाहने थेट गिरगाव चौपाटीमध्ये उभी करण्यात येत होती. त्यात मोठमोठय़ा बसगाडय़ा, ट्रक, टेम्पो आदींचा समावेश होता. विसर्जनापूर्वी चौपटीमध्ये गणपतीची आरती करण्यात येते. आरती झाल्यानंतर गणेश विसर्जन होईपर्यंत ही वाहने चौपाटीमध्येच उभी करण्यात येत होती. मात्र त्यामुळे चौपाटीमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. या वाहनांमुळे गणेशमूर्ती घेऊन येणारे अन्य भाविक आणि पर्यटकांना फटका बसत होता. गेल्या काही वर्षांपासून गिरगाव चौपाटीत विसर्जनाच्या निमित्ताने गिरगाव चौपाटीमध्ये मोठय़ा संख्येने वाहने आणण्यात येतात. गणेशमूर्ती नसलेल्या वाहनांना गिरगाव चौपाटीमध्ये प्रवेश देऊ नये, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत सूचित केले होते. मात्र वाहतूक पोलिसांकडून या वाहनांना अटकाव करण्यात येत नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:44 am

Web Title: vehicles crowd at ganpati immersion place
Next Stories
1 समुद्रकिनारीच भाविकांच्या जेवणावळी
2 जीवरक्षक उपाशी..
3 द्रुतगती महामार्गावर गर्दीवेळी अवजड वाहनांना प्रवेश बंदी
Just Now!
X