24 January 2021

News Flash

पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती

मेट्रोकामे, पूर्व उपनगरांतून येणाऱ्या वाहनांचा भार, अरुंद मार्गामुळे अडथळे 

मेट्रोकामे, पूर्व उपनगरांतून येणाऱ्या वाहनांचा भार, अरुंद मार्गामुळे अडथळे 

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : कुठे चार ते पाच मार्गिका, तर कुठे केवळ दोनच मार्गिका, काही ठिकाणी रस्त्याच्या मध्येच सुरू असलेली मेट्रो स्थानकाची कामे, तर पूर्व उपनगराशी जोडणाऱ्या दोन मार्गावरून येणारा वाहनांचा लोंढा या सर्व दिव्यातून सलग पाच मिनिटेही वेगात वाहन चालवता येत नाही, अशी पश्चिम द्रुतगती मार्गाची गळचेपीच झाली आहे. त्यामुळे बोरिवली ते वांद्रे अंतर पार करताना दोन ते तीन तास खर्ची पडत आहेत.

बोरिवलीहून प्रशस्त चार पदरी रस्त्याने निघाल्यानंतर कांदिवलीच्या समता नगर पोलीस चौकीदरम्यान वाहतुकीला पहिला फटका बसतो. त्या टप्प्यात रस्ता रुंदीकरण करताना डोंगराचा काही भाग तोडण्यात आला आहे. हलका चढ आणि वळण असल्याने या ठिकाणी वेग मंदावतो. गेल्या पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे सध्या तेथील एक मार्गिका अद्याप बंद आहे. पुढे मालाडच्या पुष्पा पार्कजवळ केवळ तीन पदरीच रस्ता शिल्लक राहतो. त्यात भर पडते ती रस्त्याच्या मधोमध सुरू असलेल्या मेट्रो स्थानकाच्या कामाची. शंकरवाडी येथे असेच रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. या ठिकाणी रस्तारोधक वापरून केवळ दोनच मार्गिका सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

गोरगावनजीक द्रुतगती मार्गाची सर्वात मोठी गळचेपी होते. आरे दुग्धवसाहतीकडे जाणाऱ्या चौकातील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस दिवसभर वाहनांचा लोंढा  दिसून येतो. हब मॉल, वनराई कॉलनी, पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी द्रुतगती मार्ग आणि सेवा रस्ता दोन्हींवर वाहनांची गर्दी वाढते. परिणामी काही दुचाकीस्वार चक्क दुभाजकावरूनच दुचाक्या हाकतात.

पूर्व उपनगरातून येणारे दोन महत्त्वाचे जोडमार्ग हे द्रुतगतीवरील वाहनांच्या गर्दीत आणखी भर घालतात. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ज्या ठिकाणी मिळतो त्या चौकातून पार होणे हे दोन्ही मार्गावरील वाहनांसाठी प्रतीक्षा करणारे ठरते. जेव्हीएलआरवर मेट्रो ६च्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने तो आक्रसला आहे. तेथील वाहतूक कोंडीला वैतागलेल्या प्रवाशांना पुन्हा हब मॉलजवळील कोंडीचा सामना करावा लागत आहे. विलेपार्ले येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यावर येथील कोंडीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम द्रुतगती मार्गावर शंकरवाडी आणि कु रार ही दोन्ही स्थानके  उड्डाणपुलाच्या बांधाजवळ नियोजित होती. त्यासाठी पुलाची संरक्षक भिंत पाडावी लागल्याने रस्ता खचला असता तसेच सेवारस्त्यावरील सेवावाहिन्यांमुळे स्थानक सेवारस्त्याच्या मध्यभागी बांधले असते तर, संपूर्ण रस्ताच व्यापून इतर सुविधांसाठी जागा राहिली नसती. त्यामुळे द्रुतगती मार्गावर ही स्थानके  स्थलांतरित करावी लागल्याचे एमएमआरडीए  अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुलाखालील रस्त्याची बिकट अवस्था

द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांच्या खालील रस्त्यावर सर्वाधिक कोंडी होत आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी एका बाजूस विविध दुकाने, काही प्रमाणात दुचाकींची छोटी-मोठी गॅरेजेस, फिरते विक्रते यांची गर्दी असते. परिणामी द्रुतगती मार्ग सोडून उपनगराच्या पश्चिमेस जाण्यासाठी उड्डाणपुलाखालून प्रवास करताना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. वाकोला जंक्शन येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस मेट्रो ३ च्या भुयारी स्थानकाचे काम सुरू असल्याने एकच मार्गिका उपलब्ध आहे. अंधेरी येथे मेट्रोच्या पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाजवळ  मेट्रो ७ च्या गुंदवली स्थानकाचे काम सुरू असल्याने तेथून ते बिसलेरी कंपनीपर्यंतचा पुलाखालील मार्गच बंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:08 am

Web Title: vehicles moved slowly on the western express highway zws 70
Next Stories
1 नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू?
2 करोना संसर्गाच्या भीतीने लाडू खरेदीकडे पाठ
3 अवैध तिकीटविक्री जोरात
Just Now!
X