थकबाकी न मिळाल्याने औषध पुरवठादारांचा संपाचा इशारा; पालिकेला सोमवापर्यंत मुदत

मुंबई : वस्तू आणि सेवा कराच्या आकारणीची घडी अद्याप न बसल्यामुळे पालिका रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे २२ कोटी ७८ लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे औषधांच्या पुरवठय़ाची रक्कम २० नोव्हेंबपर्यंत दिली नाही, तर पालिका रुग्णालयातील जीवनावश्यक औषधांचा व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा बंद करण्यात येईल जाईल, असा इशारा पुरवठादारांनी दिला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून पालिकेच्या केईएम, नायर, शीव या प्रमुख रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयात जीवनावश्यक औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, इंजेक्शन आदींचा साठा उपलब्ध नसल्याने पालिका रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधे आणावयास सांगितले जात आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मोफत औषधे मिळतील या अपेक्षेने नागरिक पालिका रुग्णालयांची वाट धरतात. मात्र गेल्या चार महिन्यांपासून रुग्णांना औषधे आणावयास सांगितले जात आहे. याबाबत अनेकदा रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतरही काही प्रतिसाद मिळाला नाही, असे  निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

याबाबत पुरवठादारांनी पालिकेला औषधांच्या खरेदीची रक्कम तातडीने भरण्याचे आवाहन केले आहे. अजूनही पालिकेकडे सुमारे २२ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. सात दिवसांमध्ये पूर्ण रक्कम दिली जाईल, अशी हमी पालिका अधिकाऱ्यांनी पुरवठादारांना दिले होते. मात्र केवळ १० टक्केच रक्कम त्यांना देण्यात आली. परंतु या काळात पुरवठादारांनी तब्बल चार-पाच कोटी रुपये किमतीच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. थकबाकीतील १० टक्के रक्कम दिल्यानंतर फारसा फरक पडलेला नाही. उलट थकबाकी आणखी वाढली आहे.

येत्या २० नोव्हेंबपर्यंत थकबाकीची रक्कम देण्यात आली नाही तर पालिका रुग्णालयांना औषधांचा पुरवठा बंद करावा लागेल, असे पुरवठादारांनी पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर पुरवठादारांना दरमहिन्याची औषध खरेदी-विक्रीची माहिती केंद्राच्या खरेदी विभागाला द्यावी लागते. मात्र औषधांची रक्कम मिळाली नसल्याने पुढे व्यवहार करता येणे शक्य नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी औषध पुरवठादारांना थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम देण्यात आली असून येत्या काही दिवसांत वस्तू व सेवा कराच्या नियमांची अंमलबजावणी करून सर्व  रक्कम देण्यात येईल. सध्या  औषध पुरवठादारांकडून काही प्रमाणात औषधे पुरवली जात  आहे. वारंवार या विषयासंदर्भात बैठकाही घेतल्या जात आहे.  येत्या काही दिवसात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.

– डॉ. अविनाश सुपे, पालिका रुग्णालयांचे प्रमुख

गेले चार महिने पालिकेने आम्हाला  पैसेच दिलेले नाहीत. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सात दिवसांमध्ये पैसे दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. पण केवळ १० टक्के रक्कमच आम्हाला मिळाली. परंतु या सात दिवसांमध्ये पुरवठादारांनी चार ते पाच कोटी रुपयांची औषधे रुग्णालयाला पुरविली आहेत. आता आम्हालाही पैशांची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर तोडगा काढून आमचे पैसे द्यावेत.

– भूषण वोरा, औषध पुरवठादार