‘सीआयआय’च्या वार्षिक भागीदारी परिषदेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असून सुमारे ६० टक्के लोकसंख्येच्या रोजगाराचा प्राथमिक स्रोत शेती आहे. त्यामुळे रोजगार वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर-उद्योगांवर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

‘सीआयआय’ या औद्योगिक संस्थेची २५ वी वार्षिक भागीदारी परिषदेचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. कृषी क्षेत्राला फायदेशीर आणि शाश्वत बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी कुक्कुटपालन, बागकाम आणि मासेमारीसारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. संशोधनावर लक्ष केंद्रित करून सुरक्षित अन्न उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, असेही नायडू म्हणाले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार भारतातील तीनचतुर्थाशापेक्षा अधिक कुटुंब मध्यम उत्पन्न गटात आहेत. आपला देश हा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक असलेला देश आहे.  ग्राहक खर्चाची उलाढाल २०३० पर्यंत १०५ लाख कोटी रुपयांवरून चारपट वाढून ४२० लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.

भारतात लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारत हा गुंतवणुकीसाठी सगळ्या जगाचे आकर्षण ठरला आहे. सगळ्यात वेगवान अशा अर्थव्यवस्थेपैकी एक अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाची आहे. तीन लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचा पल्ला आपण गाठला आहे. येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार पाच लाख कोटी डॉलपर्यंत पोहोचेल, असेही नायडू यांनी नमूद केले.

मैत्री आणि इतर व्यवसाय सुलभ धोरणांमुळे तसेच राज्यातील पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.

‘२०१८ मध्ये देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक’

सन २०१८ मध्ये देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आली असल्याचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. परकीय गुंतवणुकीबरोबरच देशातील उद्योजक मोठय़ा प्रमाणात बाहेरील देशात गुंतवणूक करीत आहेत. या परिषदेला आलेल्या इतर देशातील प्रतिनिधींना या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील उद्योजकांना भेटण्याचीही संधी मिळाली आहे. लवकरच विमान वाहतूक क्षेत्रातील ८६ देशांतील प्रतिनिधींची परिषद मुंबईला होणार असल्याचे सूतोवाचही प्रभू यांनी केले.