उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे आवाहन ; डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांची १०२वी जयंती साजरी

आजची पिढी मातृभाषेला विसरत चालली आहे. या पिढीला मातृभाषेकडे वळवणे गरजेचे आहे, असे सांगत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी मातृभाषेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कर्नाटकी संगीतातील सुप्रसिद्ध गायिका डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संगीत क्षेत्रातील ५० कलावंतांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात उपराष्ट्रपती नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डी. व्ही. शंकर, विजया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शंकर नारायण आदी मान्यवर उपस्थित होते.

तरुणांना मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपतींनी मातृभाषेच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली. प्रत्येक भाषेचे स्वत:चे सौंदर्य आहे. विविधतेत आपण सर्व एक आहोत. आपल्या जन्मभूमीला, आई-वडिलांना, गुरूला आणि मातृभाषेला कधीच विसरू नका, असे त्यांनी तरुणांना सांगितले. इंग्रजीला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानाचा वापर करून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा विस्तार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भारतीय संगीतातील मंत्रमुग्ध करणारे वैविध्य, संस्कृती, कला आणि असामान्य आणि अतुल्य वैभव याचे जतन करण्याचे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले.

संगीताच्या या व्यापक विश्वाने आणखी समृद्ध व्हावे, यासाठी सरकार, खासगी संस्था, षण्मुखानंद सभा, संगीततज्ज्ञ यांनी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी केली. षण्मुखानंद सभेने संगीत क्षेत्रात केलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या जीवन प्रवासातून युवा संगीतकारांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या संगीत कारकीर्दीतील सर्वोच्च शिखर संपादन करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे, असे आवाहन नायडू यांनी या वेळी केले. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

सुब्बलक्ष्मी फेलोशिपचे मानकरी

या सोहळ्यात ५० तरुण आणि होतकरू वादक-संगीतकारांना एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फेलोशिप बहाल करण्यात आली. यंदाच्या सत्कारमूर्तीमध्ये अनिर्भान रॉय (बासरी), राहुल वेल्लाळ (व्होकल) हिंदुस्थानी व्हॉयलिन या क्षेत्रातील यज्ञेश मिलिंद रायकर आणि हिंदुस्थानी व्होकल या क्षेत्रातील दानिश खान अल्ताफ यांचा समावेश आहे. यात प्रत्येक सत्कारमूर्तीला पुढील तीन वर्षांसाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये रोख देण्यात येणार आहेत. विजया बँकेने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) ही फेलोशिप प्रायोजित केली आहे. चेन्नई येथील ‘तारांहिनी स्कूल ऑफ डान्स’च्या विद्यार्थ्यांनी ‘मैत्री भजत’ या विख्यात रचनेवर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.