येत्या वर्षांत १५३ नवीन डबे दाखल होणार

गेल्या ९० वर्षांपासून जुन्या गाडय़ांमध्ये गुदमरणाऱ्या हार्बरवासीयांना सध्या या मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स गाडय़ांनी दिलासा दिला आहे. हार्बरकरांची उर्वरित चिंता आणि त्रास दूर करण्यासाठी आता या मार्गावर १५३ नवे डबे दाखल होणार आहेत. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात या डब्यांची बांधणी सुरू झाली असून २०१७च्या दुसऱ्या भागात हे डबे सेवेत येतील. पूर्वी हार्बर मार्गावर ९ डब्यांच्या गाडय़ा धावत होत्या. त्यामुळे १७ नव्या गाडय़ांच्या हिशोबाने हे १५३ डबे प्रस्तावित होते. आता त्यात आणखी तीन डब्यांची भर पडून १२ डब्यांच्या १३ नव्या गाडय़ा येण्याची शक्यता आहे.

विद्युत प्रवाहावर धावणारी देशातील पहिली रेल्वे फेब्रुवारी १९२५मध्ये हार्बर मार्गावर धावली होती. विशेष म्हणजे डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी देशातील शेवटची लोकलही याच मार्गावर एप्रिल २०१६मध्ये धावली. जुनाट आणि आयुर्मान संपत आलेल्या कोंदट गाडय़ांमध्ये प्रवास करताना गेली अनेक वर्षे हार्बरकरांचा जीव गुदमरला आहे. या मार्गावर १२ डब्यांची सेवा सुरू झाल्यावर एमयूटीपी-१ अंतर्गत आलेल्या सिमेन्स गाडय़ाही या मार्गावर धावू लागल्या आहेत. तरीही अजूनही या मार्गावर जुन्या गाडय़ा धावत असून त्या प्रवाशांसाठी प्रचंड गैरसोयीच्या ठरत आहेत.  हार्बर मार्गावरील ही अडचण लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ९ डब्यांच्या १७ नव्या लोकल हार्बर मार्गासाठी प्रस्तावित केल्या होत्या. हे १५३ डबे २०१७-१८ या वर्षांत हार्बर मार्गाच्या सेवेत येणार आहेत. आता हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावत असल्याने या १५३ डब्यांना आणखी तीन डब्यांची जोड देऊन एकूण १३ नव्या गाडय़ा हार्बर मार्गावर आणण्याचा विचार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या डब्यांची बांधणी चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात सुरू झाली आहे. या डब्यांमध्ये कोणत्या कंपनीची विद्युत यंत्रणा बसवण्यात येईल, याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून होणार आहे. हे डबे नव्या बंबार्डिअर गाडय़ांप्रमाणेच आरामदायक आणि हवेशीर असतील. पुढील वर्षी दुसऱ्या टप्प्यात हे डबे हार्बर मार्गावर दाखल होतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.