News Flash

करोना केंद्रांतील ‘व्हेंटिलेटर’ आता पालिकेच्या रुग्णालयांत

करोना केंद्रांमध्ये सज्ज केलेले व्हेंटिलेटर, आयसीयू या रुग्णालयांमध्ये उपलब्ध केल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतील

(संग्रहित छायाचित्र)

करोना केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी सज्ज करण्यात आलेली कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पालिकेची मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि प्रसूतिगृहामध्ये या सुविधा उपलब्ध होऊ शकतील आणि गंभीर रुग्णांना आवश्यक ती सेवा वेळेवर मिळू शकेल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर पालिकेने ठिकठिकाणी करोना काळजी केंद्र-१, करोना काळजी केंद्र-२, करोना आरोग्य समर्पित केंद्र, तसेच जम्बो करोना केंद्र सुरू केली. बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू काही छोटी करोना केंद्रे बंद करण्यात आली. आजघडीला करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. ही बाब लक्षात घेत भविष्यात करोना केंद्रांमध्ये सज्ज केलेले व्हेंटिलेटर आणि आयसीयू पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी प्रशासनाने एक समिती नियुक्त केली असून ही समिती करोना केंद्रांतील व्हेंटिलेटर, आयसीयू आणि रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्याचे काम करीत आहे.

पालिकेची तीन मुख्य मोठी रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे आहेत. पालिका रुग्णालयांमध्ये केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून आणि परराज्यांतून मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे केईएम, शीव, नायर रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असते. अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असते. मात्र आयसीयू अथवा व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांचे हाल होतात. या रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुविधा उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे सुविधा तोकडय़ा पडू लागल्या आहेत. उपनगरांतील पालिका रुग्णालयांची स्थितीही तशीच आहे. करोना केंद्रांमध्ये सज्ज केलेले व्हेंटिलेटर, आयसीयू या रुग्णालयांमध्ये उपलब्ध केल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, करोना केंद्रांमध्ये काही सुविधा, यंत्रणा मर्यादित कालावधीसाठी उपलब्धकेल्या होत्या. त्यामुळे त्यापैकी कोणती साधनसामग्री पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करता येईल याचा आढावा समिती घेत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:09 am

Web Title: ventilators in corona centers are now in municipal hospitals abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ
2 रमेश पतंगे हे समरसतेचे सारथी -सुरेश हावरे
3 मुंबईत दिवसभरात ५२९ रुग्ण
Just Now!
X