‘क्रिस’ची नवीन प्रणाली मार्च २०१६पर्यंत विकसित होणार
अँड्रॉइड किंवा विंडोज प्रणालीचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी रेल्वे तिकीटप्रणाली मोबाइलवर आल्यानंतर आता सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रिस) त्यापुढील मार्ग धुंडाळत आहे. मुंबईतील स्मार्टफोन धारकांच्या हाती मोबाइल तिकीटप्रणाली दिल्यावर उर्वरित साध्या मोबाइलधारक प्रवाशांनाही ही मोबाइल तिकीटप्रणाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्रिस नवीन प्रणाली विकसित करीत आहे. या प्रणालीनुसार साधे मोबाइल संच वापरणाऱ्या रेल्वे प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवरून रेल्वे तिकीट काढता येणार आहे. मात्र या तिकिटाची छापील प्रत घेणे आवश्यक ठरेल. ही प्रणाली मार्च २०१६पर्यंत विकसित करण्यात येणार असल्याची माहिती ‘क्रिस’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेने मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांसाठी कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीची सुरुवात मध्य रेल्वेवर ९ ऑक्टोबरपासून केली. ही प्रणाली ८ जुलैपासून पश्चिम रेल्वेवरही सुरू झाली होती. मात्र ही मोबाइल तिकीटप्रणाली केवळ अ‍ॅण्ड्रॉइड किंवा विंडोजप्रणालीचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या ७५ ते ८० लाख एवढी प्रचंड आहे. त्यापैकी अनेक रेल्वे प्रवासी हे स्मार्टफोन वापरणारे नसून त्यांच्याकडे सामान्य फोन असतात. हे रेल्वे प्रवासी मोबाइल तिकीटप्रणालीपासून वंचित राहणार आहेत. त्यांना रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीसमोर अथवा एटीव्हीएम यंत्रासमोर रांगेत उभे राहावे लागणार आहे. मात्र या रेल्वे प्रवाशांनाही मोबाइल तिकीटप्रणालीचा लाभ देण्याचा प्रयत्न ‘क्रिस’ करीत असल्याचे ‘क्रिस’च्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले. त्यासाठी ‘यूएसएसटी’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

तंत्रज्ञानानुसार रेल्वे तिकीटप्रणालीसाठी एक क्रमांक विकसित केला जाईल. ‘# किंवा *’ यांचा समावेश असलेला हा क्रमांक मोबाइलवरून लावल्यास रेल्वे तिकिटांबाबतचे विविध पर्याय प्रवाशांसमोर येतील. त्यातील त्यांना हवा तो पर्याय प्रवाशांना निवडावा लागेल, असे बोभाटे म्हणाले. मात्र साध्या मोबाइल संचावरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना एक कोड पाठवण्यात येईल. हा कोड एटीव्हीएम यंत्रात टाकून तिकिटाची छापील प्रत घ्यावी लागेल. ही प्रणाली मार्च २०१६पर्यंत मध्य तसेच पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.