मुंबई : प्रदीर्घ काळापासून चर्चेत राहिलेल्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम मार्गी लावल्यानंतर या प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून या सागरी सेतूचा विरापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यतेची चाचपणी केली जात असल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वांद्रे- वरळी सागरी सेतूच्या बांधणीनंतर एमएसआरडीसीने वांद्रे- वर्सोवा सागरी सेतूची घोषणा केली होती. त्यानुसार ५.५ किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे नऊ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असून, या सागरी सेतूच्या बांधणीचे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले आहे. येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे अंधेरी- वर्सोवा भागातील वाहने थेट दक्षिण मुंबईत येऊ शकणार असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

याच्याच पुढच्या टप्प्यात या सागरी सेतूचा विरापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मीरा- भाईंदर- नालासोपारा- वसई- विरार या भागातही दळणवळणाची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळेच वर्सोवापर्यंतच्या सागरी सेतूचा विरापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वर्सोवा ते विरार दरम्यान ४२ किमी लांबीचा सागरी मार्ग बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव एमएसआरडीसीने मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दाखविली असून प्रकल्पाची वित्तीय आणि तांत्रिक सुसाध्यता तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हा प्रकल्प उभारता येईल का, त्याचा खर्च किती होईल याचा अभ्यास सुरू असल्याचे महामंडळातील सूत्रांनी सांगितले.  एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या हा प्रकल्प प्राथमिक पातळीवर असून तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यतेचा अहवाल आल्यानंतरच प्रकल्पाची नेमकी स्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.