वेसावे-घाटकोपर मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची दैना; दुरुस्तीसाठी १३० कोटींचा खर्च

वेसावे-घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा फटका अंधेरी आणि घाटकोपर परिसरातील रस्ते, जलवाहिनी आणि मलनिस्सारण वाहिनीला बसला असून खड्डेमय झालेला येथील रस्ता दुरुस्ती न करताच पालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यातच पावसामुळे अधिकच खडबडीत झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेला १३० कोटी रुपयांचा भरुदड सोसावा लागणार आहे.

वेसावे-घाटकोपर दरम्यानच्या रस्त्यांवर मेट्रो प्रकल्पासाठी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे वेसावे ते अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम) येथील जयप्रकाश मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक (पूर्व) ते घाटकोपर दरम्यानच्या अंधेरी-कुर्ला मार्गाची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. मुसळधार पावसाने या रस्त्यांची चाळण झाली आहे. या मार्गाखालून गेलेल्या जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्याही काही ठिकाणी फुटल्या असून रस्त्याखालील उपयोगिता कंपन्यांच्या केबलनाही धक्का बसला आहे. एमएमआरडीएने या रस्त्यांची, तसेच जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती करुन देणे अपेक्षित होते. मात्र दुरावस्थेत असलेला हा रस्ता आहे त्याच स्थितीत मार्च २०१५ मध्ये पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला.

या रस्त्याची पार दैना झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडे आणि संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. फुटलेल्या जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या कामासाठी पालिकेला १३० कोटी रुपये खर्च सोसावा लागणार आहे. या कामासाठी पालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली असून याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस वगळता २४ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करावे लागणार आहे.