दिंडोशी सत्र न्यायालयाने सुंदरवाडी झोपडपट्टी हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्सोवा-लोखंडवाला प्रवास आता फक्त पंधरा मिनिटांचा होणार आहे. यारी रोडवरील रहिवाशांनी त्यांचा मार्ग रोखून धरणाऱ्या सुंदरवाडी झोपडपट्टीविरोधातील खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने यारी रोडच्या रहिवाशांच्या बाजूने निकाला देताना सुंदरवाडी झोपडपट्टी हटवण्याचा आदेश दिला आहे.

तब्बल २० वर्ष आणि पदरचे दोन लाख रुपये खर्च केल्यानंतर यारी रोडचे रहिवाशी हा खटला जिंकले. या झोपडपट्टीमुळे वाहतुकीमध्ये मोठी अडचण येत आहे. वर्सोवा आणि सात बंगल्याशी जोडला जाणारा यारी रोडचा हा रस्ता मुळात ४० फूट रुंद होता. पण अतिक्रमण झाल्यानंतर हा रस्ता आकसून फक्त १० फुटांचा राहिला होता.

झोपडपट्टीवासियांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना कोर्टाने मुंबई महापालिकेला झोपडपट्टी पाडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने ७५ पैकी ४४ झोपडपट्टीवासियांचे पूर्नवसन करण्याचाही आदेश दिला आहे. विकासआराखडयानुसार आता हा रस्ता १२० फुटांचा होणार असून वर्सोवा ते लोखंडवाला हा प्रवास ३५ ऐवजी १५ मिनिटांचा होणार आहे. ४४ पात्र कुटुंबांचे मालाड येथे पूर्नवसन केल्यानंतर हा रस्ता १२० फुटांचा होईल. बऱ्याचवर्षांनी यारीरोड वर्सोव्याच्या अन्य भागांशी जोडले जाईल.