मुंबईकरांचे आकर्षण बनलेल्या या रॅलीमधील व्हिंटेज कार गटात ‘द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड’चे अध्यक्ष विवेक गोएंका यांच्या १९३३ सालच्या दिमाखदार स्टडबेकर गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर क्लासिक गटामध्ये अमल तन्ना यांच्या १९५२ मधील फोर्ड गाडीला प्रथम पारितोषिक देण्यात आले. रॅलीमधील सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. फली धोंडय़े यांच्या १९२३ मधील रोव्हर ८, इपन वर्गीस आणि निलोफर वर्गीस यांच्या १९२८ मधील फोर्ड, झहिर अली यांच्या फोर्डला विशेष पारितोषिक देण्यात आले.
इतर निकाल
क्लासिक कार
जोसेफ कोलरेस मॉरिस ८ १९४७
उमेश रेळे मॉरिस १९५२
नेविल नेलसन डॉज १९५२
रिसेंट क्लासिक कार
कालझाद इंजिनीअर मर्सिडिझ बेन्झ १९६९
अनुजा परिख वोल्क्सव्ॉगन १९६९
रशना पुनावाला मर्सिडिझ बेन्झ १९६६
मर्सिडिझ बेन्झ, रोल्स रॉईस, ऑस्टिन, स्टडबेकर, लॅण्ड रोव्हर, शेव्हरोले, जॅग्वार, बेन्टले, डॉज ब्रदर्स, मॉरिस, हिल्मन, ब्यूक आदी नामवंत कंपन्यांच्या विविध आकारांच्या अन् आकर्षक रंगांच्या मोटरगाडय़ा रविवारी रस्त्यावर धावू लागल्या आणि मुंबईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रस्त्यावरून दुडुदुडु धावणाऱ्या सुमारे शतकापूर्वीच्या मोटरसायकल्सनी तर रसिकांना भुरळच घातली होती. निमित्त होते व्हिंटेज अॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिंटेज कार फिएस्टा २०१४’चे.
व्हिंटेज अॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे (व्हीसीसीसीआय) आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिंटेज कार फिएस्टा २०१४’मध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी सातपासून हॉर्निमन सर्कलच्या दिशेने व्हिंटेज कार धावू लागल्या. मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेले अनेक मुंबईकर राजेशाही थाटातील या गाडय़ांच्या दर्शनाने तृप्त झाले. तर सुट्टीचा दिवस असूनही हॉर्निमन सर्कल गजबजून गेले होते. एकेक गाडी येत होती आणि सर्कलमध्ये विसावत होती. सकाळी १०च्या सुमारास शंभराहून अधिक गाडय़ा हॉर्निमन सर्कलमध्ये दाखल झाल्या. आकर्षक रंगसंगती आणि भुरळ पाडणाऱ्या गाडय़ांची छायाचित्रे घेण्यात अनेक रसिक मंडळी दंग होती. तर रॅली सुरू करण्यासाठी आयोजकांची धावपळ सुरू होती. ‘द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड’चे अध्यक्ष विवेक गोएंका, मुंबई समाचारचे मालक होरमुसजी कामा, हेमंत कुमार रुईया, फली धोंडय़े आणि व्हीसीसीसीआयचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्या प्रमुख उपस्थितीत १०.३०च्या सुमारास रॅली सुरू झाली आणि फैझ परवेझ व्होरा यांची १९१५ सालातील दिमाखदार फोर्ड गाडी हॉर्निमन सर्कल सोडून चेंबूरच्या दिशेने कूच करू लागली. त्यापाठोपाठ हळूहळू एकेका गाडीला सिग्नल मिळत गेला आणि व्हिंटेज कार आपल्या गतीनुसार चेंबूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. विशेष म्हणजे १९४० ते १९८० काळातील, तसेच २०१३ पर्यंत निर्मिती झालेल्या अनेक वाहनांचा या रॅलीत समावेश होता.
गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजीअली, वरळी, प्रभादेवी, प्लाझा, दादर टीटीमार्गे व्हिंटेज कार आणि मोटरसायकली चेंबूरला रवाना होत होत्या. वाटेतील मोठय़ा चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीसही रॅलीतील वाहनांचे स्वागत करीत होते. टप्प्याटप्प्यावर आयोजक प्रतिनिधी वाहनांची नोंद करीत होते.
फोर्ड, मिनव्र्हा, वॉस्ले, रोव्हर ८, रोल्स रॉईस, लॅन्सिया, ऑस्टिन, हडसन, अॅव्हॉन, स्टडबेकर, बेन्टले, डॉज ब्रदर्स, अॅडलेर, ब्यूक, ओल्डस्मोबिल, कॅडिलॅक, हिल्मन, शेव्हरोले, मर्सिडिझ बेन्झ, लॅण्ड रोव्हर, जॅग्वार, मॉरिस मिनी, आल्फा रोमिओ, विलीज, पॉन्टिअॅक, फेरारी, फिएट, अॅम्बॅसेडर आदी कंपन्यांच्या आकर्षक मोटारगाडय़ा आणि राजदूत, यामाहा, बॉबी राजदूत, व्हेस्पा, लॅम्ब्रेटा, टाओम, एजेएस, बीएसए, रॉयल एन्फिल्ड, नॉर्टन, मॅचलेस, मोटो गुझी या दुचाकीचा ताफा हळूहळू चेंबूरच्या एकर्स क्लबमध्ये दाखल झाला. तेथेही वाहन रसिकांनी या गाडय़ा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी गर्दी केली होती.
विवेक गोएंका यांच्या
स्टडबेकर (१९३३), लॅण्ड रोव्हर (१९५७), जॅग्वार (१९७१), शेव्हरोले (१९४९); नितीन डोसा यांची कॅडिलॅक (१९४७), हेमंत कुमार रुईया यांची मिनव्र्हा (१९१९), राजेश हिमतलाल यांची लॅन्सिआ अॅस्टुरा (१९३२) या वाहनांनी रसिकांना मोहून टाकले होते. छोटेखानी फिएट गाडय़ाही लक्षवेधी ठरल्या. तसेच १९३९ मधील रॉयल एन्फिल्ड, १९५४ बीएसए, १९५९ मधील लॅम्ब्रेटा आकर्षण ठरल्या होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 4:27 am