बाळासाहेब ठाकरे जीवनदायी योजना लवकरच
महाराष्ट्रातील महामार्ग; तसेच विविध रस्त्यांवर रोज घडणाऱ्या अपघातानंतर उपचार न मिळाल्याने शेकडो जण मृत्युमुखी पडतात. काही जणांना कायमचे अपंगत्व येते, म्हणूनच जखमी रुग्णावरील तातडीच्या उपचारांसाठी आरोग्य विभागाने ‘रस्ते अपघात विमा योजना’ तयार केली आहे. अपघातातील जखमीला ३० हजार रुपयांचे विमा कवच मिळेल. या योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
राज्यातील विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इच्छुक नाहीत, तर शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत या योजनेतील बदलानंतर शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याबाबत कमालीचे आग्रही आहेत. यातून अद्यापि तोडगा निघालेला नाही. विद्यमान जीवनदायी आरोग्य योजना ही युती शासनाच्या काळातील असल्याने त्यालाही बाळासाहेबांचेच नाव दिले, जावे असा शिवसेनेचा आग्रह आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी धरला असून ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

’रुग्णांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून वा खासगी रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल.
’रुग्णालयात (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तात्काळ दाखल करण्याची सोय.
’अपघातातील रुग्णावर तीन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार.
’रुग्णाला घरी वा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहोचविण्याची जबाबदारी.
’यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा खर्चही सरकार करेल.
’३० हजार रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत जखमीला रुग्णालयात दाखल करणे, नर्सिग, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ल्याचा खर्च तसेच रक्त व ऑक्सिजन पुरवठय़ाचा खर्च.
’योजनेच्या लाभासाठी वयाची अट नाही.

स्वत:ला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलेली व्यक्ती, दारूच्या अमलाखालील व्यक्ती अथवा राज्याबाहेर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी विमा संरक्षण मिळणार नाही. या योजनेसाठी किती विमा प्रीमियम भरला जाणार आहे हे अद्याप निश्चित झाले नसले तरी जखमी व्यक्तीवरील उपचारासाठी ३० हजार रुपये खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
– ज्येष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग