तब्बल दोन महिने ऑक्टोबर हिट अनुभवलेल्या मुंबईत आता थंडीची चाहूल लागत आहे. पहाटेचे तापमान तातडीने कमी होण्याची शक्यता नसली तरी येत्या काही दिवसांत दुपारचे कडक ऊन तसेच घामापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत शहरावर असलेला बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून वायव्येकडून येणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांनी त्यांची जागा घेण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी साधारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईत गारवा सुरू होतो. मात्र या वेळी ईशान्य मान्सूनचा तडाखा आणि कमी दाब क्षेत्रांमुळे वाऱ्यांची सतत बदलणारी दिशा यामुळे मुंबईतील हिवाळा लांबला. राज्याच्या अंतर्गत भागात किमान तापमान १५ अंश से.दरम्यान आणि कमाल तापमान ३१ अंश से.दरम्यान राहण्यास सुरुवात झाली असली तरी मुंबई व कोकणात पश्चिमेकडील बाष्पयुक्त वारेच प्रभावी ठरत होते. त्यातच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानेही उत्तरेतील वारे अडवले. मात्र आता हे अडथळे दूर झाले असून वायव्येकडून येत असलेल्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे उकाडा कमी जाणवत आहे. दिवसभर हे वारे सुरू असले तरी रात्री ईशान्य किंवा उत्तरेकडून वारे येण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटेची थंडी जाणवत नाही. पुढील काही दिवस सकाळचे तापमान २० अंशांदरम्यान राहणार असून कमाल तापमान मात्र ३६ वरून ३२ ते ३४ अंश से.पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सकाळची थंडी पडण्यासाठी मात्र वाट पाहावी लागेल, असे वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. डिसेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद ही साधारण तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवडय़ात होते. त्यामुळे थंडी येण्याची आशा करण्यास हरकत नाही.