मुंबई : ‘महाभारत’ मालिके तील इंद्रदेवाच्या भूमिके तून परिचयाचे झालेले, हिंदी आणि पंजाबी चित्रपटातून काम के लेले ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल यांचे शनिवारी करोनामुळे लुधियाना येथे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

‘महाभारत’, ‘सर्कस’, ‘विक्रम वेताळ’ अशा वेगवेगळ्या मालिकांमधून त्यांचा चेहरा घराघरात परिचयाचा झाला होता. ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या सतीश कौल यांनी हिंदी चित्रपटांमधून अभिनेता देव आनंद, दिलीप कु मार यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम के ले होते. हिंदी आणि पंजाबी भाषेतील मिळून तीनशे चित्रपटांमधून त्यांनी काम के ले होते, मात्र त्यांना खऱ्या अर्थाने नाव आणि प्रसिद्धी पंजाबी चित्रपटांनीच मिळवून दिली. एके काळी श्रीमंतीत मिरवलेल्या सतीश कौल यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध मात्र हलाखीच्या परिस्थितीचा सामना करण्यात गेला. लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला आणि पत्नी परदेशी निघून गेली. आईवडिलांच्या उपचारासाठी म्हणून त्यांना त्यांचे घर विकावे लागले. अखेर त्यांनी मुंबई सोडली आणि ते लुधियानात स्थायिक झाले.