03 March 2021

News Flash

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

'शांतता कोर्ट चालू आहे'तील बेणारे बाईंच्या व्यक्तिरेखेने त्यांना निराळी ओळख मिळवून दिली

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे

आपल्या अभिनय गुणांनी मराठी तसेच हिंदी सिने-नाट्य जगतावर अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुलभाताई आजारी होत्या. निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
छबिलदास शाळेतील शिक्षिका ते समर्थ नाट्यकर्मी, प्रगल्भ अभिनेत्री असे संपन्न व्यक्तिमत्त्व सुलभाताईंना लाभले. प्रायोगिक रंगभूमीवर त्या निष्ठेने काम करत राहिल्या. त्यामानाने व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे आगमन उशिरा झाले. विजय तेंडुलकरांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’तील बेणारे बाईंच्या व्यक्तिरेखेने त्यांना निराळी ओळख मिळवून दिली. व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शकीय कारकीर्द भरात असताना त्यांचे पती अरविंद देशपांडे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सुलभाताईंनी अरुण काकडे यांच्या साथीने ‘आविष्कार’ कार्यरत ठेवली. समविचारी नाट्यसंस्था, समूहांच्या एकत्रित चळवळीला ‘छबिलदास चळवळ’ म्हणून मिळालेल्या लौकिकात सुलभाताईंचा सहभाग महत्त्वाचा होता.
त्यांचे रंगभूमीवरील वावरणे असो की प्रत्यक्षातील संवाद त्यात सहजता, सोपेपणा आणि मनाचा मोकळेपणा जाणवतो. संगीत नाटक अकादमी, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान यांनी त्यांचा गौरव झाला होता.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले – विनोद तावडे
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले. ‘अविष्कार’ या नाट्यनिर्मितीच्या माध्यमातून त्यांनी बालरंगभूमीला व्यासपीठ मिळवून दिले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ मधील बेणारे बाई ते हल्लीच्या ‘मिसेस तेंडुलकर’ या विनोदी मालिकेतील राणे आजी या भूमिकामधील त्यांचा बाज, आवाका, एकूण मांडणीतील त्या व्यक्तिरेखेची व्याप्ती हे सारे काही भिन्न. सुलभा देशपांडे या सहज अभिनयासाठी परिचित होत्या. रंगभूमी असो की चित्रपट चोखंदळ रसिकांच्या मनातील ज्यांचे स्थान अढळ आहे, अशा दुर्मिळ कलाकारांपैकी एक म्हणजे सुलभाताई. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 7:44 pm

Web Title: veteran actor sulbha deshpande passed away
Next Stories
1 खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडून फटाके वाजवून जल्लोष
2 जळगावमध्ये खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक
3 ‘शर्तभंग’प्रकरणी कारवाईला खडसेंचा खो
Just Now!
X