26 February 2021

News Flash

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

हसतमुख चेहरा आणि सहजसुलभ अभिनयाची दैवी देणगी घेऊन आलेल्या सुलभाताईंनी चाहत्यांच्या मनात अमीप ठसा उमटवला होता.

सुलभा देशपांडे

नाटय़चळवळीचा आवाज शांत झाला

वैचारिकतेची कास केवळ अभिनयापुरती मर्यादित न ठेवता नाटय़-चित्रपट चळवळीच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देणाऱ्या आणि अखेपर्यंत हाती घेतलेल्या कार्यासाठी झगडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे शनिवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. फेब्रुवारी महिन्यातच ऐंशीव्या वर्षांत पदार्पण केलेल्या सुलभाताई गेली काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक खंदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हसतमुख चेहरा आणि सहजसुलभ अभिनयाची दैवी देणगी घेऊन आलेल्या सुलभाताईंनी चाहत्यांच्या मनात अमीट ठसा उमटवला होता. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे (पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर) यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले.

शांतता कोर्ट चालू आहे, या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या शिक्षिकेची त्यांची भूमिका अतिशय गाजली. या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची ताकद पहिल्यांदा जगाला दाखवून दिली. याच नाटकावर याच नावाचा चित्रपटही आला आणि त्याचीही रसिकांनी दखल घेतली. ‘जैत रे जैत’, ‘चौकट राजा’, ‘विहीर’, ‘हापूस’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला.

‘रेनेसाँ’च्या काळात समाजजीवन ढवळून निघाले असताना त्याचे परिणाम नाटय़-चित्रपट क्षेत्रावरही तितक्याच वेगाने झाले. विजय तेंडुलकरांनी मुलांसाठी नाटक लिहायला सांगितले म्हणून सुलभाताई लिहित्या झाल्या. त्यांचा रंगभूमीशी संबंध आला तेव्हा नवविचाराचे वारे ‘रंगायन’च्या निमित्ताने उभे राहिले होते. विजयाबाई मेहता यांनी स्थापन केलेल्या या ‘रंगायन’च्या प्रवाहात त्या सामील झाल्या. आणि मग त्याच ‘रंगायन’चे बोट पकडून प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने काम करता करता तिथून बाहेर पडून १९७१ साली पती अरविंद देशपांडे यांच्याबरोबरीने त्यांनी ‘अविष्कार’ची सुरूवात केली. पहिल्यांदा छबिलदास शाळेच्या सभागृहात मुहूर्तमेढ झालेली या ‘अविष्कार’ची नाटय़चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवली.

रंगभूमीपुरती आपली अभिनयकला मर्यादित न ठेवता त्याच वेळी हिंदीत जो समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला होता त्यातही सुलभाताई तितक्याच उत्साहाने सामील झाल्या. हिंदीत ‘भूमिका’, ‘अरविंद देसाई की अजब दास्ता’, ‘गमन’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’, ‘विजेता’, ‘भीगी पलके’, ‘इजाजत’, ‘विरासत’ हे त्यांचे चित्रपट गाजले. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा हिंदी चित्रपट ठरला. ‘कोंडुरा’ या हिंदी तसेच तेलुगू चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ‘राजा रानी को चाहीए पसीना’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला बालचित्रपट गाजला होता.

त्यांनी अनेक हिंदी व मराठी दूरचित्रवाणी मालिकांतही काम केले होते. तीन वर्षांपूर्वी हिंदीत ‘सोनी’ वाहिनीवरील ‘केहता है दिल जी ले जरा’ या मालिकेतून त्यांनी अशीच एक छान आजी रंगवली होती. त्याहीवेळी पंच्याहत्तरी पार केलेल्या सुलभाताईंचा उत्साह हा तरुण कलाकारांनाही लाजवणारा होता. त्यावेळी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला येत नाही, अशी तक्रोर त्यांनी केली होती. मात्र ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ मालिकेमुळे त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली.

नाटय़चळवळीचा भाग होऊन राहणे एकवेळ सोपे असते पण ज्या विचारांच्या मुशीत आपण तयार झालो त्यांची मुळे घट्ट पकडून चळवळीच्या माध्यमातून सतत नव्या पिढीपर्यंत ते विचार पोहोचवणे, त्यांना घडवणे हे कार्य फार कमी कलाकारांकडून घडते. सुलभाताई या अशा चळवळींच्या अध्र्वयू होत्या. अनेक कलावंत त्यांनी घडविले होते.

१९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तन्वीर पुरस्काराने २०१० साली त्यांच्या रंगभूमीच्या सेवेचा गौरव करण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 8:28 pm

Web Title: veteran actor theatre person sulabha deshpande passed away
Next Stories
1 …म्हणून मी करिनासोबत फोटो काढला नाही- शाहिद कपूर
2 ‘दमलेल्या बाबाची कहाणी’च्या प्रोमो आणि पोस्टरचे लाँच
3 कलाकारांनी केली तळजाई टेकडी हिरवी !
Just Now!
X