१९६० सालचा काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं (२५ मार्च) बुधवारी राहत्या घरी निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.  निम्मी यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच, ‘तुम्ही आरके कुटुंबाचा एक भाग होतात’, असं म्हणत अभिनेता ऋषी कपूर यांनीही आदरांजली वाहिली.

निम्मी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांना जुहू येथील घराजवळ असलेल्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली होती. त्यांना माणसं ओळखता येत नसल्याचं म्हटलं जातं.

राज कपूर यांच्या १९४९ साली प्रदर्शित झालेल्या बरसात या चित्रपटातून त्या नावारुपाला आल्या होत्या.  विशेष म्हणजे त्यांचं खरं नाव नवाब बानो असं असून राज कपूर यांनी त्यांना ‘निम्मी’ हे नाव दिलं होतं. ‘बरसात’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. निम्मी एक लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच त्यांचे आरके कुटुंबासोबतही चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ऋषी कपूर यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली.

‘आत्म्यास शांती लाभो, निम्मी आंटी, बॉबी चित्रपटाच्या प्रिमियर प्रदर्शनावेळी आणि अन्य बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही दिलेल्या आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी मनापासून आभार मानतो. तुम्ही आरके कुटुंबाचा एक भाग होतात. बरसात तुमचा पहिलाच चित्रपट होता’, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं.

दरम्यान, निम्मी यांनी राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार या सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. निम्मी यांनी लेखक अली राजा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. अली राजा यांचं २००७ साली निधन झालं.

निम्मी यांचे गाजलेले चित्रपट

‘उडन खटोला’, ‘आन’, ‘भाई-भाई’, ‘मेरे महबूब’ आणि ‘पूजा के फूल’ या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय तुफान लोकप्रिय झाला होता.