News Flash

Reema Lagoo Passes away: ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू अनंतात विलीन

त्यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू Reema Lagoo यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दुपारी ३.१५ वाजता ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील कलाकार मंडळींनी त्यांना अखेरचा निरोप दिला. आमिर खान, किरण राव, महेश मांजरेकर, मनोज जोशी, सोनाली कुलकर्णी यांसह अनेक सेलिब्रिटिंनी चित्रपटसृष्टीतील लाडक्या आईला श्रद्धांजली वाहिली.

५९ वर्षीय रिमा यांना छातीत दुखत असल्यामुळे काल कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री एकच्या सुमारास रिमाताईंचे निधन झाल्याची माहिती त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी दिली. 

हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष बुलंद’ ही त्यांची नाटकं विशेष गाजली होती. बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. सलमान खान, काजोल, जुही चावला आणि माधुरी दीक्षितच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. रिमा यांच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील ‘आई’ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘आई शप्पथ’, ‘बिंधास्त’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’ यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांना ‘मैने प्यार किया’ (१९९०), ‘आशिकी’ (१९९१), ‘हम आपके है कौन’ (१९९५) आणि ‘वास्तव’ (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले सीन

१९५८ मध्ये भडभडे यांच्या कुटुंबामध्ये रिमाताईंचा जन्म झाला. रिमाताईंना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या मराठी रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे लेकुरे उदंड जाहली हे नाटक त्यावेळी रंगभूमीवर गाजत होते. पुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असतानाच रिमाताईंनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेचच रंगभूमीवर छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रिमाताईंनी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. अभिनेते विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर रिमा लागू या नावाने त्या विविध भूमिका साकारू लागल्या.

फोटो गॅलरी : सुखाची पुन्हा दुःख चाहूल देते…

अभिनेता संजय दत्त याची प्रमुख भूमिका असलेल्या वास्तव चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली आईची भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2017 8:03 am

Web Title: veteran actress reema lagoo passes away
टॅग : Marathi Movies
Next Stories
1 ‘इनहाऊस’ प्रवेश घेणाऱ्यांना ‘अकरावी ऑनलाइन’चे दार बंद
2 इमारतींच्या ‘यूआयडी’ मोहिमेचाही फज्जा?
3 न्यायालयाचे आदेश धुडकावणे भोवणार
Just Now!
X