मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सत्तरच्या दशकात उत्तम नायिकांच्या गर्दीत बोलके  डोळे आणि अवखळ अभिनयशैलीच्या जोरावर आपली दखल घ्यायला लावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी दुपारी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

हिंदी चित्रपटांमधून सातत्याने छोटय़ा-मोठय़ा भूमिका केलेल्या शशिकला यांनी त्या वेळचे सर्व नावाजलेले अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर काम के ले होते. त्यांच्या बोलण्याची ढब ही इतरांपेक्षा वेगळी होती. त्याचा उत्तम वापर करत त्यांनी खलनायिके च्या किं वा सहनायिके च्या भूमिका करतानाही आपला वेगळेपणा कायम ठेवला. पडद्यावर कितीही मोठे कलाकार मुख्य भूमिके त असले तरी शशिकला यांचा पडद्यावरचा वावर कधीही दुर्लक्षित राहिला नाही. याच वेगळेपणाच्या जोरावर शंभरहून अधिक हिंदी चित्रपटांमधून काम के लेली ही अभिनेत्री शशिकला याच नावाने लोकप्रिय होती.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

लहानपणापासून जात्याच हुशार असलेल्या शशिकला जवळकर यांची सिनेसृष्टीशी ओळख त्या वेळच्या इतर अनेक कलाकारांप्रमाणेच आर्थिक विवंचनेतून झाली. त्यांच्या आयुष्याची कथाही एखाद्या चित्रपटाच्या कथानकासमान भासावी अशी आहे. सोलापूरमध्ये एका उद्योजकाच्या घरी जन्माला आलेल्या शशिकला वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच नृत्य-अभिनयाचे कार्यक्रम सादर करत असत. मात्र काही दुर्दैवी घटनांमुळे वडिलांच्या व्यवसायाची आर्थिक दशा सुरू झाली आणि हे कु टुंब कामाच्या शोधात मुंबईला आले. शशिकला यांना सिनेमात कु ठे तरी काम मिळेल, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. प्रत्यक्षात सिनेमाची वाट सहजी सापडत नव्हती. तोपर्यंत मिळतील ती कामे शशिकला यांनी के ली. त्याच दरम्यान त्यांची भेट प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँ यांचे पती शौकत हुसैन रिझवी यांनी ‘झीनत’ या चित्रपटात एका कव्वालीमधून त्यांना संधी देऊ के ली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका के ली. त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘आरती’ या चित्रपटातील खलनायिके च्या भूमिकेमुळे. या चित्रपटात मीनाकु मारी, अशोककु मार आणि प्रदीपकु मार यांच्या भूमिका होत्या. याच चित्रपटाने त्यांना फिल्मफे अर पुरस्कारही मिळवून दिला. त्यापूर्वी शशिकला यांनी बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ चित्रपटातही काम के ले होते. ‘आरती’ या चित्रपटानंतर त्यांना साहाय्यक भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. ‘अनुपमा’, ‘आयी मिलन की बेला’, ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘खुबसूरत’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका के ल्या. मात्र त्यांची खरी ओळख ही खलनायिका अशीच राहिली.

चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यापूर्वीच विसाव्या वर्षी त्यांनी ओमप्रकाश सैगल यांच्याशी विवाह के ला. इतक्या लहान वयात विवाह करण्याच्या निर्णयामुळे त्या चर्चेत आल्या. दोन मुली झाल्यानंतर मात्र त्यांचे वैवाहिक नाते फार काळ तग धरू शकले नाही. त्या पुन्हा एकदा दुसऱ्या व्यक्तीबरोबर परदेशात निघून गेल्या, मात्र त्या व्यक्तीकडून छळणूकच त्यांच्या वाटय़ाला आली. अखेर मायदेशी परतल्यानंतर त्यांनी काही काळ मदर तेरेसा यांच्याबरोबर सामाजिक कार्यात झोकू न दिले. त्यानंतर पुन्हा एकदा त्या मुंबईत परतल्या आणि सिनेमा-मालिकांमधून काम सुरू के ले. त्या काळात ‘बादशाह’, ‘चोरी चोरी’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा चित्रपटांतून त्या पुन्हा रसिकांसमोर आल्या. त्यांनी त्या वेळी ‘जीना इसी का नाम है’, ‘दिल देके  देखो’, ‘अपनापन’, ‘सोनपरी’सारख्या मालिकांमधूनही काम के ले होते.

अनेक नाटय़मय घडामोडीनंतर आयुष्यात स्थिरावलेल्या शशिकला यांचा कायम हसरा चेहराच लोकांसमोर यायचा. हसरा चेहरा आणि लाघवी बोल असलेल्या शशिकला सळसळत्या उत्साहाने पडद्यावर आणि पडद्याबाहेरही वावरल्या. आपल्या छोटय़ा-मोठय़ा भूमिकांमधून का होईना सातत्याने अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या शशिकला या चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णकाळाच्या साक्षीदार होत्या. त्यांच्या जाण्याने या सुवर्णपर्वातील आणखी एक पान गळून पडल्याची खंत चित्रपटसृष्टीत व्यक्त होते आहे.

अभिनयकलेचा श्रीगणेशा सोलापुरात

सोलापूर : शशिकला मूळच्या सोलापूरच्या. त्यांचे बालपण याच शहरात गेले. एवढेच नव्हे तर बालपणीच अभिनयाचे धडे त्यांना याच शहराने दिले होते. त्या वेळच्या आठवणींना त्यांच्या निधनानंतर उजाळा मिळाला आहे.

याच शहरातील शुक्रवार पेठेत भावसार शिंपी समाजात जवळकर कुटुंबीयांमध्ये शशिकला यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय जवळकर कुटुंबीयांचा शुक्रवार पेठेतील माणिक चौकात जुना वाडा होता. तेथेच शशिकला यांचे बालपण गेले. त्यांना नृत्य, अभिनयाचा छंद होता. गणेशोत्सवात दरवर्षी शुक्रवार पेठेत मानाच्या आजोबा गणपतीपुढे मेळे होत. या मेळ्यांमध्ये कवी संजीव, माधवराव दीक्षित, अंबण्णा शेडजाळे, चिकवीरय्या स्वामी, शिवलिंगप्पा जिरगे ही तत्कालीन कलावंत मंडळी सहभागी होऊन अभिनय कला पेश करीत असत. याच मेळ्यांमध्ये बालकलावंत म्हणून छोटय़ा शशिकला हिला अभिनयाची संधी मिळाली. त्यांच्या अभिनयकलेला सोलापुरात प्रोत्साहन मिळाले आणि कालांतराने शशिकला चित्रपटसृष्टीत अभिनय करण्यासाठी मुंबईत गेल्या. त्यांच्या कलेला वाव मिळाला आणि त्यांचा लौकिक वाढत गेला. त्यांच्या या वाटचालीत सोलापूरकरांना त्यांचे विस्मरण होणे अशक्य होते. त्यांचा सोलापूरशी संपर्क तुटल्यानंतरही मुंबईत कोणी सोलापूरशी संबंधित भेटले तर त्यांच्याशी बोलताना त्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत असत. २००७ साली शशिकला खूप दिवसांनी सोलापुरात आल्या होत्या. बालपणीचे सोलापूर आणि आता बदललेले सोलापूर पाहून त्यांच्या भावना ओथंबल्या होत्या.