भारतीय आधुनिक चित्रांना नवे सौष्ठव देणारे विख्यात चित्रकार ए. ए. (अब्दुल अझीझ) रायबा यांचे नालासोपारा येथील राहत्या घरी शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

पत्नीच्या निधनानंतर, गेली दोन वर्षे ते आजारीच असत. बुधवारपासून त्यांची तब्येत अत्यंत खालावली आणि शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रायबा हे ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’चे समकालीन आणि एम. एफ. हुसेन व कृष्णाजी आरा यांचे खास मित्र. प्रोग्रेसिव्हांना प्रोत्साहन देणाऱ्या रूडी व्हॉन लायडन यांनी रायबांचीही प्रशंसा केली होती.

सागरी लोकजीवनाचे चित्रण रायबांच्या चित्रांमध्ये असे. लघुचित्रांसारखी सपाट प्रतलावर मानवाकृती दाखवण्याची त्यांची शैली असली, तरी त्यांच्या चित्रांतील मनुष्याकृती मेहनती आणि निव्र्याजपणे कार्यरत असताना दिसत, त्यासाठीची शारीर धाटणी या आकृतींना लाभलेली असे. हे पाहून समीक्षक मेक्सिकन भित्तिचित्रांचीही आठवण काढत. मात्र अशा कोणत्याही एका शिक्क्यात न मावणारी रायबा यांची शैली होती, अशी आदरांजली त्यांच्या चित्रांविषयी संशोधन करणारे अभ्यासक व ‘क्लार्क हाऊस कला-प्रकल्पा’चे संयोजक सुमेश शर्मा यांनी वाहिली. रायबा यांचा जनाजा शुक्रवारीच संध्याकाळी मरीन लाइन्स येथील दफनभूमीत आला, मात्र त्या वेळी मुंबईतील चित्रकारांना याची माहिती देण्यात आली नव्हती. रायबांनी सुरुवातीचे कलाशिक्षण ज्या ‘नूतन कला मंदिरा’त घेतले, तेथेच शिकलेले ए. ए. आलमेलकर यांचे मोठे सिंहावलोकनी प्रदर्शन शुक्रवारी संध्याकाळीच सुरू झाले. ‘‘तेथे आलमेलकरांनी केलेली लोकजीवनाची चित्रे पाहताना रायबाही आठवत होते.. त्याच दिवशी त्यांचे निधन व्हावे हा योगायोग,’’ असे ज्येष्ठ चित्रकार सुधीर पटवर्धन ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.

* मूळचे कोकणी असलेल्या रायबांनी १९५० च्या सुमारास काश्मीरचा दौरा करून तागाच्या (ज्यूट) गोणपाटासारख्या जाड कापडावर तैलचित्रे काढण्याचे तंत्र विकसित केले होते.

* मराठी, गुजराती, इंग्रजी आणि उर्दू या भाषांत त्यांना गती होती.

* उर्दू-इंग्रजी काव्यानुवाद तसेच उर्दू शायरीही त्यांनी कधीकाळी केली होती.