21 September 2018

News Flash

 ‘घाटाचा राजा’च्या अपघाती मृत्यूचे गूढ कायम

मोईझ शेख या तरुणाला ५ नोव्हेंबर रोजी पहाटे मानखुर्द उड्डाणपुलाजवळ खळे जखमी अवस्थेत आढळले

सायकलपटू अशोक खळे (संग्रहित छायाचित्र)

अशोक खळे यांची सायकलही बेपत्ता, फिर्याद देणाऱ्यावरच संशय

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25900 MRP ₹ 29500 -12%
    ₹4000 Cashback
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%
    ₹1485 Cashback

शिवछत्रपती पुरस्कार विजेते, घाटाचा राजा आणि आशियातील ‘बेस्ट व्हील बाईंडर’ असा लौकिक मिळवणारे सायकलपटू अशोक खळे (६५) यांच्या अपघाती मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. शीव-पनवेल मार्गावर ५ नोव्हेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळलेल्या खळे यांचा गेल्या रविवारी मृत्यू झाला. मात्र घटनास्थळी सीसीटीव्ही नसणे, खळे यांची सायकल बेपत्ता असणे आणि खळे यांना जखमी अवस्थेत वाशीतील रुग्णालयात सोडणाऱ्या फिर्यादीचे चौकशीतील असहकार्य अशा विविध गोष्टींमुळे त्या दिवशी नेमके काय घडले, याचा सुगावा लागलेला नाही.

वांद्रे-कुर्ला संकुल येथे राहणारे व पेशाने व्यावसायिक असलेल्या मोईझ शेख या तरुणाला ५ नोव्हेंबर रोजी पहाटे मानखुर्द उड्डाणपुलाजवळ खळे जखमी अवस्थेत आढळले. मोईझने आपल्या वाहनातून खळे यांना वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वाशी पोलिसांनी मोईझची फिर्याद नोंदवून घेत अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला. आपण येण्यापूर्वीच अपघात घडला होता व खळे यांची सायकलही तेथे पडली होती, असे मोईझने त्या वेळी फिर्यादीत म्हटले होते. मात्र मानखुर्द उड्डाणपूल मुंबई पोलिसांच्या हद्दीत असल्याने या अपघाताचा तपास मानखुर्द पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी मोईझला अधिक माहिती घेण्यासाठी बोलावले. मात्र तो तेथे फिरकलाच नाही. खळे कुटुंबीयांनाही मोईझ याने अर्धवट माहिती दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मोईझच्या कारनेच खळे यांच्या सायकलीला धडक दिली असावी, असा संशय खळे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

मानखुर्द पोलिसांनी तपास सुरू करताना अपघात कुठे व कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मानखुर्द उड्डाण पूल ते जकात नाक्यापर्यंतचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात खळे मानखुर्द उड्डाणपुलावरून सायकलिंग करताना दिसतात, मात्र ते जकात नाक्यावर पोहोचत नाहीत. यादरम्यान रस्त्यावर सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे अपघात नेमका कुठे व कसा घडला याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. खळे यांची सायकलही बेपत्ता आहे. वर्षभरापूर्वीच निवडक मित्रांनी खळे यांना नवी, अद्ययावत सायकल विकत घेऊन दिली होती. या सायकलची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत असावी. फिर्यादी मोईझच्या जबाबानुसार त्याने सायकल जखमी खळे यांच्या शेजारी पाहिली होती. मग ती गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘अपघात घडला त्याच्या दोन आठवडय़ांआधी बाबा असेच खोपोलीला गेले होते. संध्याकाळी सात वाजता परतले. पण तोपर्यंत आम्ही सर्वच अस्वस्थ होतो. ते खोपोलीनंतर लोणावळा घाट चढले. मात्र त्यांना थकवा जाणवल्याने थांबत थांबत ते घरी आले होते. ५ नोव्हेंबरलाही आम्ही बाबा लोणावळयापर्यंत गेले असावेत, असे गृहित धरून होतो. पण रात्री नऊ वाजल्यानंतर आमचा धीर सुटत गेला,’ असे खळे यांचा मुलगा प्रथमेश याने सांगितले. प्रथमेशच्या माहितीनुसार खळे गुजरातच्या साबरमती सायक्लोथॉन स्पर्धेची तयारी करत होते. सलग दोनवर्षे ही स्पर्धा त्यांनी जिंकली होती.

याप्रकरणातला फिर्यादी(मोईझ) पोलीस ठाण्यात आलेला नाही, असे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त लखमी गौतम यांनी लोकसत्ताला सांगितले.

मानखुर्द पोलीस ठाण्याचे अधिकारी सीसीटीव्ही चित्रण तपाण्यासोबतच अपघाताला प्रत्यदर्शी साक्षीदार आहे का याचीही माहिती घेत आहेत, असेही ते म्हणाले.

२९ तासांनी उपचार

अपघातानंतर वाशी येथील महापालिका रुग्णालयात तब्बल बारा तास खळे यांना उपचारांविना तसेच ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले. तब्बल २९ तासांनी खळे यांना नेमके उपचार मिळाले.  मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने १२ नोव्हेंबरच्या दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

First Published on November 15, 2017 3:27 am

Web Title: veteran cyclist ashok khale death mystery continues